Join us  

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी होणार; एक्स्प्रेस वेच्या रुंदीकरणाच्या कामाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 5:14 AM

राष्ट्रीय महामार्ग ४ हा पुण्याच्या पुढे बंगळुरूपर्यंत सहा पदरी करण्यात येत आहे.

मुंबई : आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट या दरम्यानच्या मार्गावर कोसळणाऱ्या दरडी, चढ-उताराच्या प्रमाणामुळे पावसाळ्यात एक बाजू बंद ठेवावी लागते. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रुंदीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था या पट्ट्यात दोन्ही बाजूंनी सुमारे ६६४ मीटरपर्यंत बोगदा खोदण्यात आला आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार आहे.यामध्ये खालापूर ते खोपोली असा मार्ग आठ पदरी करण्याचे काम सध्या सुरू आहे. खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था या १३.३ कि.मी. दरम्यान दोन बोगदे आणि दोन पूल बांधण्यात येत आहेत. यामुळे खोपोली ते सिंहगड असे १९ कि.मी. अंतर १३.३ कि.मी.वर येणार आहे. यामुळे मुंबई-पुणे असा प्रवास २५ मिनिटांनी कमी होईल. आडोशी बोगदा ते खंडाळा हा सहा पदरी मार्ग असला, तरी दहा पदरी मार्गाइतकी वाहतूक असते. या मार्गावर दरडीही कोसळून वाहतूककोंडी होते.

राष्ट्रीय महामार्ग ४ हा पुण्याच्या पुढे बंगळुरूपर्यंत सहा पदरी करण्यात येत आहे. जेएनपीटी ते राज्य महामार्ग क्र. ४ रस्त्याचे सहा पदरीकरण झाल्यानंतर वाहतुकीत वाढ होणार आहे. नवी मुंबई विमानतळामुळे पुणे ते नवी मुंबई वर्दळ वाढणार आहे. शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर प्रकल्प आणि चाकण विमानतळामुळे वाहतूक वाढणार आहे. दिघी बंदर प्रकल्प मुंबई- पुणे कॉरिडोरपासून ५० किमी अंतरावर असल्याने, एक्स्प्रेस वेवरील वाहतूक वाढणार आहे. भविष्यात वाढणाºया वाहतुकीचा अंदाज घेता, रुंदीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

 

टॅग्स :मुंबईपुणे