Join us  

मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 4:51 AM

पहिला टप्पा पीएमआरडीए प्राधिकरणाच्या गहुंजे ते उस्से गावापर्यंतचा ११.८ किलोमीटरचा होता.

पुणे : सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून फडणवीस सरकारने मान्यता दिलेल्या, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.‘हायपर लूप’ जगात कुठे झालेली नाही, त्यामुळे त्याची ट्रायल आपल्याकडे नको. ‘हायपर लूप’ची ट्रायल घ्यायची आपली क्षमता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़ प्रथम जगात तो किमान दहा किलोमीटर तरी अस्तित्वात येऊ द्या. नंतर बघू, असे पवार यांनी सांगितले़ मी या प्रकल्पाला नाही म्हटले नाही, पण ‘हायपर लूप’ची ट्रायल घ्यायची आपली क्षमता नाही, असे त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे ते मुंबई हायपर लूप प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा करार केला होता़ हा प्रवास ताशी १,२२0 किलोमीटर असेल तशी त्याची रचना होती़ हायपरलूप सुरू झाल्यानंतर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते वाकड (पुणे) दरम्यानचे ११७.५ किलोमीटरचे अंतर २३ मिनिटांत पार करता येईल, असे त्यांनी सांगितले होते़ ७0 हजार कोटींच्या प्रकल्पासाठी दुबईतील कंपनी गुंतवणुकीस तयार झाली होती़

पहिला टप्पा पीएमआरडीए प्राधिकरणाच्या गहुंजे ते उस्से गावापर्यंतचा ११.८ किलोमीटरचा होता. तो अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन होते़ त्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद होती़ पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्यास बीकेसी ते वाकडपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन होते. त्यानुसार हा टप्पा ६ ते ८ वर्षांत पूर्ण करण्यात येणार होता़प्रथम जगात तो किमान दहा किलोमीटर तरी अस्तित्वात येऊ द्या. नंतर बघू, असे पवार यांनी सांगितले़ मी या प्रकल्पाला नाही म्हटले नाही, पण ‘हायपर लूप’ची ट्रायल घ्यायची आपली क्षमता नाही. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :हायपर लूपअजित पवार