मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसक चकमकींचे राज्यातही पडसाद उमटत आहेत. जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आयआयटी पवईतील विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉब केला. तर, काही सेलिब्रिटींनी मध्यरात्रीच गेट वे आॅफ इंडियावर कँडल मार्च काढण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. जेएनयूतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर सुनियोजितपणे भ्याड हल्ला करण्यात आला.ही झुंडशाही, हिंसक कृती लोकशाहीविरोधी असून मी त्याचा तीव्र निषेध करतो, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. तर, जामिया मिलीया किंवाजेएनयू सारख्या विद्यापीठांमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर हिंसक हल्ल्यांचे प्रकार गंभीर आणि चिंताजनक आहेत, असे म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीसुद्धा जेएनयूतील हिंसेचा निषेध केला. दरम्यान, अभाविपनेसुद्धा हिंसेचा निषेध केला आहे. जेएनयूमध्ये डाव्या संघटनांकडूनच हिंसक कारवाया सुरू असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
जेएनयूतील हिंसाचाराचा मुंबईतही नोंदवला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 05:58 IST