Join us  

मुंबई बंदराचा विकास करावा, सावंत यांची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 6:20 AM

खासदार अरविंद सावंत यांची लोकसभेत मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुंबई बंदराचा विकास करण्याची योजना अनेक वर्षांपासून रेंगाळलेली असून, केंद्र सरकारने याकामी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (मुंबई दक्षिण) यांनी बुधवारी लोकसभेत विशेष उल्लेखाद्वारे केली. कापड गिरण्या व बंदरांमुळे मुंबईच्या विकासाला एक वेगळेपण मिळाले होते;  परंतु ही  दोन्ही क्षेत्रे अस्तंगत पावत आहेत. 

मुंबई बंदराचा विकास करण्याची योजना आखण्यात आली होती;  परंतु ही योजना रखडली आहे. ही योजना त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी खासदार सावंत यांनी केली. सेंद्रिय कापसाची लागवड सेंद्रिय कापसाची निर्यात करण्यासाठी केंद्र सरकार योग्य पावले उचलत आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिली. सेंद्रिय कापसाची लागवड वाढविण्यासाठी केंद्र सरकार काय पावले उचलत आहे, असा प्रश्न काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर (चंद्रपूर) यांनी उपस्थित केला. 

रेल्वे पीटलाइन हलवू नये औरंगाबाद येथील प्रस्तावित रेल्वे पीटलाइन जालना येथे हलवू नये, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (औरंगाबाद) यांनी केली. यावेळी त्यांनी शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाचे प्रलंबित काम त्वरित सुरू करण्याबाबत लोकसभेत मुद्दा उपस्थित केला.

नवनीत राणांचा हक्कभंग काही दिवसांपूर्वी अमरावतीत पोलिसांशी झालेल्या वादामुळे खासदार नवनीत राणा (अमरावती) यांनी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावाची दखल घेऊन लोकसभेच्या हक्कभंग समितीने महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना येत्या ६ एप्रिलला लोकसभा हक्कभंग समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. खासदारांचे संसदीय कर्तव्य पार पाडण्यात या अधिकाऱ्यांनी खासदार राणा यांना अटकाव केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :अरविंद सावंतमुंबई