Join us

मुंबईचे राजकारण: सहा प्रभागांच्या रचनेतील बदल कोणत्या पक्षाच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:50 IST

महापालिका निवडणुकीत सर्वपक्षीयांची कसोटी : नवीन रचनेमुळे समीकरणांमध्ये मोठे बदल 

- जयंत होवाळ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी अंतिम मंजुरीनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. त्यात सहा प्रभागांत काही प्रमाणात बदल झाले आहेत. त्यापैकी चार प्रभाग हे पश्चिम उपनगरातील, तर दोन प्रभाग पूर्व उपनगरातील असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सहा प्रभागांतील रचनेतील बदल कोणाच्या पथ्यावर पडणार, हे स्पष्ट होण्यास वेळ लागेल. मात्र, त्यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. 

काही विभागांत भौगोलिक समतल साधने आणि नव्या प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या जागांचे संतुलन साधून काही बदल झाले आहेत. पश्चिम उपनगरातील १३, ३४, ४३ आणि ९५ या प्रभागांत बदल झाले आहेत, तर पूर्व उपनगरांतील १३० आणि १६९ या प्रभागांत बदल झाले आहेत. प्रभाग क्रमांक १३ हा बोरीवली पश्चिमेत येतो. या प्रभागातील काही भाग प्रभाग क्रमांक १४ मध्ये गेला आहे. प्रभाग क्रमांक १४  दत्तपाडा रोड, जय महाराष्ट्र नगर रोड यांसारख्या भागांत पसरलेला आहे. येथील निवासी भागानुसार राजकीय पक्षांना मतदान होईल. 

माजी नगरसेवकांच्या मतदानावर परिणाम ? प्रभागरचनेत काही प्रभागांच्या रचनेत झालेल्या बदलांचा परिणाम संबंधित माजी नगरसेवकांच्या मतदानावर होऊ शकतो का? हा त्यातील कळीचा मुद्दा आहे.मात्र, त्या प्रभागातील नेमका किती भाग दुसऱ्या प्रभागात गेला आहे, हे स्पष्ट झाल्यानंतरच माजी नगरसेवकांना त्याचा अंदाज येऊ शकतो. 

प. उपनगरातील स्थिती मालाड पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक ३४ चा काही भाग प्रभाग क्रमांक ३२ मनोरी, आकाशवाणी नगरमध्ये आला आहे.  प्रभाग क्रमांक ४३ हासुद्धा मालाड पश्चिमेकडील आहे. या प्रभागाचा काही भाग ४२ मध्ये गेला आहे.  प्रभाग क्रमांक ९५ मध्ये एम.आय.जी. कॉलनी, सरकारी वसाहत  आणि कला नगर यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.  या प्रभागाचा काही भाग प्रभाग क्रमांक ९६ मध्ये गेला आहे. या प्रभागात खेरवाडीचा भाग येतो.

पूर्व उपनगरातील चित्र पूर्व उपनगरातील प्रभाग क्रमांक १३० च्या रचनेतही काही बदल झाला आहे. हा प्रभाग गोवंडी शिवाजी नगरमध्ये मोडतो. प्रभाग क्रमांक १६९ सायन यातसुद्धा बदल झाला आहे. या प्रभागांव्यतिरिक्त अन्य प्रभागांमध्ये बदल झालेले नाहीत. ज्या प्रभागांमध्ये बदल झाले आहेत, तेही मोठ्या प्रमाणावर झालेले नाहीत. एका संकुलातील काही इमारतींचे मतदान एका बूथमध्ये, तर काही इमारतींचे मतदान दुसऱ्या बूथमध्ये आढळून आल्यानंतर त्या संकुलाचे मतदान एकाच बूथच्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीने किरकोळ बदल करण्यात आले आहेत

‘कोस्टल’, अटल सेतू परिसराचे काय ?अटल सेतू, कोस्टल रोड आणि काही ठिकाणी बांधण्यात आलेल्या जेट्टींमुळे काही मोकळ्या जागा निर्माण झाल्या आहेत. त्या परिसराचा वेगवेगळ्या प्रभागांमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या निवडणूक विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Politics: Ward Changes Favor Which Party in Upcoming Elections?

Web Summary : Mumbai's ward restructuring for the 2026 elections sees minor changes in six wards, mainly in western and eastern suburbs. These adjustments, driven by geographical leveling and new projects, could impact voting patterns and favor certain political parties as the electoral landscape shifts.
टॅग्स :मुंबई महानगरपालिका