Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलीसही स्वीकारणार आता देणग्या, पोलीस फाउंडेशन स्थापनेला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 06:18 IST

मुंबई : शौर्य व तपासकामातील कौशल्यामुळे जगभरात आगळी ओळख असलेल्या मुंबई पोलीस दलाला आता खासगी देणगीदार, उद्योगसमूह व संस्था-संघटनांकडून लाखोंच्या देणग्या स्वीकारण्यासाठी मोकळीक मिळाली आहे.

जमीर काझी मुंबई : शौर्य व तपासकामातील कौशल्यामुळे जगभरात आगळी ओळख असलेल्या मुंबई पोलीस दलाला आता खासगी देणगीदार, उद्योगसमूह व संस्था-संघटनांकडून लाखोंच्या देणग्या स्वीकारण्यासाठी मोकळीक मिळाली आहे. अर्थात पोलीस दलाचे आधुनिकीकरण व पोलिसांच्या कल्याणकारी योजनांसाठी त्यांना हा निधी घेता येणार आहे. त्यासाठी काही अटी घालून मुंबई पोलीस फाउंडेशन नावाचा स्वतंत्र न्यास स्थापनकरण्यास गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या काही दिवसांत त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.सध्या अनेक पोलीस ठाणी, क्राइम ब्रँच व विशेष शाखांकडून कार्यालयाची अंतर्गत दुरुस्ती व सजावट तसेच अन्य कामांसाठी ‘आॅफ द रेकॉर्ड’ उद्योगपती, बिल्डर, लोकप्रतिनिधी व तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांकडून निधी घेतला जातो. आता पोलीस फाउंडेशन स्थापन करण्यात आल्यामुळे छुप्या पद्धतीने चालणाºया या प्रकाराला आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.नागरिकांच्या जीवित व वित्त रक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांना शासनाकडून स्टेशन, चौकीतील मूलभूत व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळण्यासाठी अनेक महिने तिष्ठत राहावे लागते. त्याशिवाय मिळणारी रक्कम ही अतिशय तुटपुंजी असते. त्यामुळे अनेकवेळा संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाºयांकडून स्थानिक भागातील उद्योजक, बिल्डर व अन्य देणगीदारांच्या मदतीने आवश्यक साधनांची उपलब्धता करतात. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी, शासनाची परवानगी घेणे आवश्यक असले तरी अनेकदा त्याकडे डोळेझाक केली जाते. देणगीदारांमध्ये काही वादग्रस्त व्यक्तींचा समावेश असल्याने ही बाब उघड झाल्यानंतर त्याबाबत टीकाही होते. त्याशिवाय अनेक उद्योगसमूह, खासगी संस्था देणगी देण्यासाठी इच्छुक असतात, मात्र त्याला रीतसर अधिकृतपणे व्यासपीठ नसल्याने त्यांची अडचण होत होती. त्यामुळे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी रीतसर स्वतंत्र न्यास स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव २९ आॅगस्टला गृह विभागाकडे पाठविला होता. जगातील विविध देशांमध्ये अशा प्रकारे पोलिसांच्या साहाय्यासाठी निधी गोळा करण्यात येत असल्याचे त्यामध्ये नमूद करून मुंबई पोलीस फाउंडेशन स्थापन करण्याची मंजुरी मागण्यात आली होती. त्याबाबत काही अटी घालून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.>देणगी स्वीकारण्यासाठीच्या अटीदेणगी देणाºया खासगी व्यक्ती, संस्था व उद्योगसमूह हे वादग्रस्त अथवा त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी, गुन्हे दाखल असता कामा नयेत. खासगी व्यक्ती / संस्थांकडून निधी स्वीकारल्यामुळे पोलिसांना त्यांचे कार्य व कर्तव्यांवर कसल्याही प्रकारे दबाव येता कामा नये याची दक्षता घावी. पोलीस फाउंडेशनसाठी धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज करण्यापूर्वी त्याबाबत विधि व न्याय विभाग आणि संबंधित विभागाकडून त्याची तपासणी करण्यात यावी.

 

टॅग्स :पोलिसमुंबई पोलीस