Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिक पुन्हा अडकणार? पोलिसांनी बंद केली एक केस, कोर्टाने दिले दुसऱ्या चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:16 IST

माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळालेला असताना कोर्टाने मात्र त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Nawab Malik Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना एका प्रकरणात दिलासा मिळाला आहे. मात्र दुसऱ्या एका प्रकरणामुळे त्यांची चिंता वाढली आहे. पुराव्याअभावी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या प्रकरणात माजी मंत्री मलिक यांच्याविरुद्ध क्लोजर रिपोर्ट दाखल करणार असल्याचे मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या ॲट्रॉसिटी कायद्याच्या खटल्याचा तपास केला असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, समीर वानखेडे यांच्या बहिणीने नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या बदनामी आणि पाठलाग केल्याच्या तक्रारीचा पोलिसांना तपास करण्याचे आदेश मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. त्यावेळी वानखेडे मुंबईत नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर होते. त्यादरम्यान यास्मिन वानखेडे यांनी मलिकांविरोधात कोर्टात धाव घेतली होती. यास्मिन वानखेडे या समीन वानखेडे यांची मोठी बहीण असून त्या व्यवसायाने वकील आहेत. यास्मिन वानखेडे यांनी याचिकेत म्हटले की, मलिक यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर, विशेषत: तिचा भाऊ समीर वानखेडे यांच्यावर खोटे, बदनामीकारक आणि निराधार आरोप केले आहेत. कुटुंबावर दबाव आणण्याच्या दुर्भावनापूर्ण हेतूने हे केले गेले. मलिक यांच्या कथित बदनामीकारक पोस्टचे तपशील देत त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ड, ४९९ आणि ५०० व्यतिरिक्त ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती याचिकेद्वारे केली होती.

यास्मिन वानखेडे यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, नवाव मलिक यांनी यास्मीन यांची सोशल मीडिया पोस्ट वाचली होती आणि त्यांचे काही फोटो डाउनलोड केले होते आणि ते त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले होते, त्यामुळे ते पाठलाग करण्यासारखे आहे. सोमवारी, वानखेडे यांचे वकील अली काशिफ खान देशमुख यांचे म्हणणे ऐकल्यानंतर दंडाधिकारी ए.के. आवारी यांनी कलम २०२ सीआरपीसी अंतर्गत चौकशी करा असा आदेश दिला. 

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या एफआयआरबाबत मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲट्रॉसिटी कायद्याच्या प्रकरणाचा आम्ही तपास केल्याचे मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. पुराव्याअभावी आम्ही या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करत आहोत, असं पोलिसांनी कोर्टाला सांगितले.

दरम्यान, २०२१ जानेवारीमध्ये, नवाब मलिकांच्या जावयाला वानखेडे यांच्या टीमने ड्रग्ज व्यवसायात गुंतल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धर्म, वैवाहिक जीवन आणि अगदी शैक्षणिक पात्रतेबद्दल भाष्य करत त्यांच्याविरुद्ध कथित पुराव्यांची मोहीम सुरू केली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये जेव्हा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला वानखेडेंच्या पथकाने अटक केली, तेव्हाही मलिक यांना या प्रकरणातील अनेक त्रुटींवर भाष्य करणाऱ्या अनेक सोशल मीडिया पोस्ट टाकल्या होत्या. त्यानंतर एनसीबीने आर्यन खानवर आरोपपत्र दाखल केले नाही. 

टॅग्स :नवाब मलिकसमीर वानखेडेउच्च न्यायालयमुंबई पोलीस