Join us  

Beggar Free Mumbai: मुंबईत आता भिकारी दिसणार नाहीत! मुंबई पोलिसांनी सुरू केली मोठी मोहीम

By मोरेश्वर येरम | Published: February 13, 2021 12:42 PM

Beggar Free Mumbai Campaign By Mumbai Police: मुंबईला भिकारीमुक्त करण्यासाठी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी पुढाकार घेतला आहे.

मुंबईतल्या चौकाचौकात किंवा सिग्नलवर आशाळभूत नजरेनं भिक्षा मागणारे भिकारी आता दिसणार नाहीत. कारण मुंबई पोलिसांनी भिकाऱ्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली असून भिकाऱ्यांना पकडून त्यांची चेंबूरमधील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोय करण्यात येत आहे. (Mumbai Police Started Beggar Free Mumbai Campaign)

मुंबईला भिकारीमुक्त करण्यासाठी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून रस्त्यावर फिरणाऱ्या आणि भिक्षा मागणाऱ्या भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महत्वाची बाब अशी की पकडण्यात येणाऱ्या भिकाऱ्यांची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.

भिकाऱ्यांना पकडण्याच्या मोहीमेची सुरुवात देखील झाली असून मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्याकडून १४ भिकाऱ्यांना पकडून त्यांना भोईवाडा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यासोबतच त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर चेंबूर येथील भिक्षेकरी स्विकार केंद्रात त्यांची सोय केली जाणार आहे.कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुरू केलेली भिकाऱ्यांविरोधातील मोहित ही संपूर्ण फेब्रुवारी महिना घेतली जाणार आहे. 

भिकाऱ्यांविरोधातील कारवाईचं कारण काय?मुंबईच्या रस्त्यावर अनेकदा भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जातो. लहान मुलांचा वापर करुन सहानभुती मिळवून पैसे कमावणाऱ्यांची भिकाऱ्यांची टोळी मुंबईत विकसीत झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय, अनेक लहान मुलांचं अपहरण करुन त्यांना भिक मागायला लावण्याचे प्रकारही घडतात. काहींनी तर मुंबईच्या चौकाचौकात भीक्षेला व्यवसाय बनवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी याविरोधात आता धडक मोहीम सुरू केली असून फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांकडून विभागातील भिकाऱ्यांना पकडले जाणार आहे.  

टॅग्स :भिकारीमुंबई पोलीसविश्वास नांगरे-पाटीलमुंबई