Join us

मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:10 IST

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळ्याप्रकरणी छापे टाकले आहेत.

Mithi River Desilting Scam: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पाच्या घोटाळ्याबाबत पहिला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई नदी स्वच्छता प्रकल्पाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई पोलिसांनी पहिला एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात, आर्थिक गुन्हे शाखेने सकाळपासून मुंबईतील ८ ते ९ ठिकाणी छापे टाकले आहेत. एफआयआरनुसार या घोटाळ्यात ५५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळ्याप्रकरणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासून,आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतील ८ हून अधिक ठिकाणी छापे टाकत आहेत, ज्यात कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांची कार्यालये आणि निवासस्थानांचा समावेश आहे. या प्रकरणात पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ, दोन कंपनी अधिकारी आणि तीन महापालिका अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा घोटाळा करणाऱ्यांनी कचरा हटवण्याचे खोटे दावे सादर करून महापालिकेचे नुकसान केल्याचाआरोप आहे.  या एफआयआर अंतर्गत एकूण ५५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा अंदाज आहे.  

गेल्या २० वर्षांपासून मिठी नदी स्वच्छ करण्याचा प्रकल्प सुरू असून यासाठी ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण १८ कंत्राटदारांकडे हे काम देण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी एसआयटीने या प्रकरणात कैलाश कन्स्ट्रक्शनचे मनिष काशिवाल, अॅक्यूट एंटरप्रायजेसचे ऋषभ जैन आणि मंदीप एंटरप्रायजेसचे शेर सिंह राठोड या कंत्राटदारांना समन्स बजावले होते. सहपोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त आणि पोलीस निरीक्षक हे या घोटाळ्याच्या संदर्भातील एसआयटीमध्ये आहेत. २००५ ते २०२१ पर्यंतच्या सर्व कंत्राटाची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी विधान परिषदेत या प्रकरणी चौकशीची घोषणा करण्याची मागणी भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर यांनी केली होती.

एप्रिलच्या सुरुवातीला, आर्थिक गुन्हे शाखेने १० कंत्राटदारांची चौकशी करत मुंबई महापालिकेला नदीच्या पात्रातून काढलेल्या ढिगाऱ्याचे प्रमाण नोंदवले गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज सादर करायला सांगितले होते. पोलिसांना पाहायचे आहे की, प्रत्यक्षात नदीतून गाळ काढला होता का आणि तो काढताना त्याचे वजन केले होते का, त्याची व्हिडिओग्राफी किंवा त्याचे फोटो काढले होते का. खिचडी घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा, लाईफलाइन हॉस्पिटल घोटाळा आणि बॉडी बॅग खरेदी घोटाळा यासारख्या प्रकरणांनंतर आता आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणातही महत्त्वाची कारवाई करण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकामुंबई पोलीस