मुंबई पोलीस अधिकारी तैवानमध्ये चमकला; आशिया पिकलबॉल गेम्स स्पर्धेत पटकावले सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2023 23:57 IST2023-10-06T23:55:59+5:302023-10-06T23:57:07+5:30
विशाल जाधवने तैवानमध्ये भारतीय तिरंगा फडकावताना आशिया पिकलबॉल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली.

मुंबई पोलीस अधिकारी तैवानमध्ये चमकला; आशिया पिकलबॉल गेम्स स्पर्धेत पटकावले सुवर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या विशाल जाधवने तैवानमध्ये भारतीय तिरंगा फडकावताना आशिया पिकलबॉल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. विशालने पुरुषांच्या ३५ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या एनग्युएन थांगला पराभूत केले. त्याचप्रमाणे, १६ वर्षांवरील पुरुष गटात आदित्य रुहेलानेही सुवर्ण पदक जिंकले. ५० वर्षांवरील पुरुष एकेरीत ठाकूरदास रोहिरा यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
आशिया पिकलबॉल महासंघाच्या (एएफपी) मान्यतेने आणि चायनीज तैपई पिकलबॉल संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीयांनी तीन पदकांची कमाई केली. यामध्ये मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या विशालने ३५ वर्षांवरील गटाच्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या एनग्युएनला ११-६, १०-११, ११-० असे नमवले. सामना १-१ असा बरोबरीत आल्यानंतर विशालने अखेरच्या सेटमध्ये जबरदस्त खेळ करताना एनग्युएनला एकही गुण जिंकू न देता दिमाखात बाजी मारली.
१६ वर्षांवरील गटाच्या अंतिम सामन्यात आदित्यने पिछाडीवरुन बाजी मारताना फिलिपाईन्सच्या लिएंडर लाझारो याचा ६-११, ११-३, ११-४ असा झुंजार पराभव केला. ५० वर्षांवरील गटाच्या अंतिम सामन्यात मात्र ठाकूरदासला तैवानच्या यीओंग हाँगविरुद्ध ६-११, २-११ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.