मुंबई : पश्चिम बंगालमध्ये खुनाच्या आरोपात पसार असलेल्या दोन कुख्यात गुंडांना गुरुवारी अटक करण्यात आली. हावडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने ही संयुक्त कारवाई केली. आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत़ त्यांना पश्चिम बंगालला पाठविण्यात येणार आहे.अहमद अली अब्दुल कादिरे उर्फ प्रेम (३७) आणि हसन रमीझ सलामत अली उर्फ गुलजार अन्सारी (२१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक १७ जानेवारी, २०१९ मध्ये मनवर अली उर्फ गुडडू नामक इसमाचा खून करून हे दोघे पसार झाले होते. ते मुंबईच्या विलेपार्ले परिसरात येणार असल्याची माहिती हावडा पोलिसांनी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेला दिली. त्यानुसार, कक्ष ९ चे प्रमुख महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक कोरे, हेड कॉन्स्टेबल झोडगे आणि पथक यांनी हावडा पोलिसांसोबत विलेपार्ले रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचला. या सापळ्यात बदीरे आणि अन्सारी अडकले. त्यांना ताब्यात घेत कक्ष ९ ला नेत चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी खासगी वैमनस्यातून गुडडूचा खुन केल्याची कबुली दिली. तसेच कादिरे याच्यावर देखील आणखीन एक खुनाचा गुन्हा असून त्यातही तो फरार आहे़
पश्चिम बंगालमधील कुख्यात गुंडांना मुंबई पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 01:00 IST