मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तरुणांनी धोकादायक स्टंटबाजी करून रस्त्यावर हैदोस घातला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्वत:सह दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालून जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी चांगला धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. अदनान मोहम्मद इसा खान (वय, २०), मुकीम बशीर खान (वय, २२) आणि जुनैद अवद अली खान (वय, २०) अशी त्यांची नावे आहेत. आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत आणि मुंबईत टॅक्सी चालवतात. त्यांच्याविरोधात आरसीएफ पोलीस ठाण्यात कलम २८१, कलम १२५ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ३(५) तसेच धोकादायक पद्धतीने गाडी चालवण्याशी संबंधित मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीच्याआधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही तरूण पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये धोकादायक स्टंटबाजी करताना दिसत आहेत. काही तरूण चक्क धावत्या गाडीतून बाहेर डोकावत आहेत. अशा बेपर्वा कृतींमुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली. या स्टंटमध्ये सहभागी असलेल्या इतरांची ओळख पटविण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.