Join us  

"संजय राऊतांचं आम्ही काय बिघडवलं? माझ्यासमोर आले तर..."; पत्राचाळ रहिवासी वृद्ध महिलेचा संताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 6:10 PM

संजय राऊतांचं आम्ही काय बिघडवलं होतं? आज जर ते माझ्यासमोर आले तर मी चपलेचा प्रसाद देईन, असा संताप पत्राचाळ प्रकल्पग्रस्त ८५ वर्षीय आजीनं व्यक्त केला आहे.

मुंबई-

संजय राऊतांचं आम्ही काय बिघडवलं होतं? आज जर ते माझ्यासमोर आले तर मी चपलेचा प्रसाद देईन, असा संताप पत्राचाळ प्रकल्पग्रस्त ८५ वर्षीय आजीनं व्यक्त केला आहे. शांताबाई मारुती सोनावणे या जेव्हा वयाच्या १३ वर्षांच्या होत्या तेव्हा त्या लग्न होऊन पत्राचाळीत राहायला आल्या. आज त्या ८५ वर्षांच्या आहेत. त्यांनी पत्राचाळ पुनर्विकास रखडल्यामुळे रहिवाशांना वनवास भोगावा लागतोय अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. 

"पत्राचाळीत जेव्हा राहायला आले तेव्हा इथं २० रुपये भाडं होतं पण आज इथं दर गगनाला भिडले आहेत. घर खाली केल्यानंतर बिल्डरनं काही वर्ष आम्हाला भाडं दिलं देखील. पण त्यानंतर त्यानं हात वर केले. आम्ही संजय राऊतांचं काय बिघडवलं होतं? त्यांच्या घोटाळ्यामुळे आज आम्हाला भोगावं लागत आहे", असं शांताबाई वारंवार बोलत होत्या. 'नवभारत टाइम्स'नं शांताबाई सोनावणे यांच्याशी बातचित केली.  

आता आम्हाला पुनर्विकास होईल आणि आम्ही आमच्या हक्क्याच्या घरात राहायला जाऊ याची कोणतीही आशा नाही, असं शांताबाई सांगतात. "वयाच्या १३ व्या वर्षी मी इथं राहायला आले. आज माझं वय ८५ वर्ष आहे. घराच्या मोबदल्यात आम्हाला फ्लॅट मिळणार होता. पण अजूनही काही त्याचा पत्ता नाही. मी जीवंत असेपर्यंत घर मिळेल याची आशाही नाही. नेते येतात आश्वासनं देतात आणि जातात. त्यानंतर कुणी ढुंकूनही पाहात नाही. आजच्या घडीला या पत्राचाळीतील प्रत्येक रहिवासी बेघर आहे. इथंतिथं राहून दिवस काढत आहे", असं शांताबाई म्हणाल्या. शांताबाई यांच्या घरच्या कमाईचं काही मोठं स्त्रोतही नाही. त्यांच्या घरचे सदस्य इतरांच्या घरी घरकाम करुन घर चालवत आहेत. 

घर चालवायचं की भाडं द्यायचं?शांताबाई सांगतात की, पत्रा चाळ सोडल्यानंतर आम्ही भाड्याच्या घरात राहत आहोत. घराचं भाडं २० हजार रुपये आहे. भाडं द्यायला एक-दोन दिवस उशीर केला तर मालक घर सोडून जा म्हणतो. मग आम्ही आमचा संसार कसा चालवायचा? आमच्या घरात कुणी कमावता नाही. कुटुंबातील महिला इतरांच्या घरी काम करून दोन वेळचं जेवण मिळेल इतकी कमाई करत आहेत.

टॅग्स :संजय राऊतशिवसेना