Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा, ठाण्यात पोलिसी दट्ट्या मिळताच हजर; १४ जणांविरुद्ध गुन्ह्याचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:41 IST

त्यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा आदेश  सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांनी दिला आहे...

मुंबई :  महापालिकेतर्फे २९ डिसेंबर २०२५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला जे कर्मचारी गैरहजर असतील त्यांची नावे त्वरित महापालिका निवडणूक विभागाला कळवावीत. त्यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा आदेश  सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांनी दिला आहे. 

निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी - कर्मचाऱ्यांची बैठक आज पालिका मुख्यालयातील समिती सभागृहात पार पडली. यावेळी विशेष कार्य अधिकारी विजय बालमवार,  सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे, उप जिल्हाधिकारी अंजली भोसले आदी यावेळी उपस्थित होते. मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी हे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा कणा असतात. त्यामुळे प्रशिक्षण सत्रांना उपस्थित राहून प्रत्येकाने आपली भूमिका, जबाबदारी आणि अधिकार स्पष्टपणे समजून घ्यावेत, जेणेकरून मतदानाच्या दिवशी कोणताही संभ्रम किंवा अडथळा निर्माण होणार नाही, शंकरवार यांनी सांगितले.

प्रशिक्षण सत्रात काय?प्रशिक्षण सत्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) ओळख करून देण्यात येऊन बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट  यांची अचूक हाताळणी, परस्पर जोडणी तसेच त्यांची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात येईल. मतदान सुरू करण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या मॉक पोलची संपूर्ण प्रक्रिया, त्याची नोंदणी, तसेच मॉक पोलनंतर यंत्रे सील करण्याची कार्यवाही सविस्तरपणे समजावून सांगण्यात येईल, असे विशेष कार्य अधिकारी (निवडणूक)  विजय बालमवार यांनी सांगितले.

प्रशासनाची कठाेर भूमिका; १४ जणांविरुद्ध गुन्ह्याचे पत्रलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या  निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी १४ कर्मचारी अद्याप निवडणूक कामासाठी हजर न झाल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली. अशा कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत मुंब्रा प्रभाग समितीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना शुक्रवारी पत्र दिले. यामुळे काही कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, शुक्रवारी सायंकाळी ते निवडणूक कामावर हजर झाले.निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना यापूर्वी नोटिसा पाठविण्यात आल्या. तरीही काही कर्मचाऱ्यांनी हजर राहणे टाळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थेट कारवाईचा इशारा दिला. यासंदर्भातील पत्रासोबत गैरहजर राहिलेल्या बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादीही जोडण्यात आली असून, या यादीत एकूण १४ जणांचा समावेश आहे. मुंब्रा प्रभाग समितीमधील प्रभाग क्रमांक ३० आणि ३२ चे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोष्टी यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.

दहा हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणनिवडणूक विभागाने सविस्तर प्रशिक्षण कार्यक्रम आखला असून, एकूण २ हजार ५३० पथके तयार केली. या पथकांमधील सुमारे १० हजार १२० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण गडकरी रंगायतन व घाणेकर नाट्यगृह येथे २७ ते २९ डिसेंबरदरम्यान दोन सत्रांत होणार आहे. आतापर्यंत १५० कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय कारणे, गर्भधारणा, अपंगत्व अशा कारणांनी ड्युटीमधून सूट देण्याची मागणी करणारे अर्ज सादर केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai officials warned; Thane staff present after police action; FIR letter.

Web Summary : Mumbai warns action against absent election training staff. Thane: 14 employees face FIR for skipping duty; some reported after police intervention. Training covers EVM handling.
टॅग्स :मुंबई महानगरपालिका