२०२४ मध्ये देशभरात महागड्या भूखंड विक्रीचे एकूण १३३ व्यवहार झाले असून यातील सर्वाधिक ३० व्यवहार एकट्या महामुंबई परिसरात झाले आहेत. या ३० व्यवहारांमध्ये एकूण ६०७ एकर भूखंडांची विक्री झाल्याची माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे.
सर्वेक्षणानुसार, २०२४ मध्ये १३३ व्यवहारांमध्ये एकूण २५१५ एकर जागेची विक्री झाली आहे. २०२३ मध्ये हा व्यवहाराचा आकडा ९७ एवढा होता. त्यावेळी एकूम २७०७ एकर जागांचा व्यवहार झाला. त्यामुळे २०२३ आणि २०२४ या दोन वर्षात मिळून एकूण २३० भूखंड विक्रीद्वारे ५२२२ एकर जागेचे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या जागेपैकी ७७ टक्के भूखंड हे गृहनिर्माणासाठी खरेदी करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पनवेल, अलिबाग येथे सर्वाधिक भूखंड विक्री झाली आहे. मुंबई शहरात काही खासगी उद्योगसमूहांनी निवासी प्रकल्पांसाठी भूखंड खरेदी केले आहेत.
दिल्ली, बंगळुरू अव्वल तीनमध्ये१. भूखंड विक्रीच्या व्यवहारात महामुंबईच्या प्रथम क्रमांकानंतर दिल्ली व एनसीआर अशा दोन्ही ठिकाणी मिळून ३८ व्यवहारांची नोंद झाली आहे. २. येथे एकूण ४१७ एकर जागेच्या विक्री व्यवहाराची नोंद झाली आहे. २३०७ एकर जागेच्या २६ व्यवहारांसह बंगळुरू शहर तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. विशेष म्हणजे, नागपूर आणि सुरत या दोन शहरांमध्येही लक्षणीय व्यवहार झाले आहेत. ३. २०२४ मध्ये नागपूरमध्ये एकूण १०० एकर जागा विकली गेली आहे. तर सुरतमध्ये ३०० एकर जागेची विक्री झाली आहे.
शहरातील व्यवहार हजारो कोटींचेमुंबई शहरातील एका व्यवहारात २४ एकर आकारमानाचा भूखंड ८ हजार कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. तर अंधेरी परिसरात १० एकर जागेची विक्री ११ हजार कोटी रुपयांना झाली आहे.