लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रूळ ओलांडणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनोखी युक्ती शोधली आहे. रेल्वे स्थानकांत दोन रूळांमध्ये बसविलेल्या लोखंडी कुंपणावर तेल (ऑइल) लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हात व कपडे काळे होण्याच्या भीतीने प्रवासी हे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न टाळतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.
मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या नेटवर्कवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येणारी लोकल पकडण्यासाठी अनेकजण सुरक्षित पर्यायांचा वापर न करता थेट रूळ ओलांडण्याचा मार्ग निवडतात. अशा प्रकारे ट्रेसपासिंग करताना अचानक ट्रेन आल्यास गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण होतो.
कुंपण, पूल, एस्कलेटरची सुविधा
रेल्वे प्रशासनाच्या मते, रूळ ओलांडण्यामुळे होणारे अपघात हे उपनगरी मार्गांवरील जीवितहानीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहेत. प्रवाशांना सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उपनगरी मार्गावर १४७ फूट ओव्हरब्रिज, तसेच ११० एस्कलेटर आणि ५४ लिफ्ट उभारण्यात आल्या आहेत. तरीदेखील काही प्रवासी या सुविधांकडे दुर्लक्ष करून कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सुरक्षित प्रवासाठी प्रशासन सरसावले
प्रवाशांच्या निष्काळजीमुळे होणारे ट्रेसपासिंग व अपघात कमी करण्याच्या उद्देशाने चर्चगेट ते विरार दरम्यानच्या स्थानकांमधील कुंपणावर तेल लावण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. याशिवाय सीसीटीव्ही देखरेख, विशेष दंडात्मक मोहीम आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जात असून प्रवाशांनी स्वतःच्या सुक्षिततेसाठी रूळ ओलांडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Web Summary : Western Railway oils fences between tracks to deter trespassing. This aims to prevent accidents, a major cause of suburban fatalities, despite bridges and escalators. The initiative, nearing completion between Churchgate and Virar, is coupled with CCTV surveillance and awareness campaigns.
Web Summary : पश्चिम रेलवे ने ट्रैक पार करने वालों को रोकने के लिए पटरियों के बीच बाड़ पर तेल लगाया है। पुलों और एस्केलेटरों के बावजूद, इसका उद्देश्य दुर्घटनाओं को रोकना है, जो उपनगरीय मौतों का एक प्रमुख कारण है। चर्चगेट और विरार के बीच यह पहल जल्द ही पूरी हो जाएगी, साथ ही सीसीटीवी निगरानी और जागरूकता अभियान भी चलाए जा रहे हैं।