मुंबई नाइट लाइफ ओके!
By Admin | Updated: February 17, 2015 02:20 IST2015-02-17T02:20:22+5:302015-02-17T02:20:22+5:30
मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुंबई नाइट लाइफ ओके!
मुंबई : मुंबईत आता रात्रभर रेस्टॉरन्ट, बार आणि पब सुरू असल्याचे चित्र लवकरच बघायला मिळेल. यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबई आणि पुण्यात रेस्टॉरन्ट,
बार आणि मॉल्स रात्रभर सुरू ठेवावेत, अशी मागणी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबईतील १९९२च्या दंगली आणि नंतर २६/११च्या दहशतवादी हल्ल्याने या नाइट लाइफवर मर्यादा आल्या आहेत. मात्र राकेश मारिया यांनी अलीकडेच अनिवासी भागातील रेस्टॉरन्ट, बार व पब रात्रभर सुरू ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र मॉल्स रात्रभर सुरू ठेवण्याचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला. शिवाय हॉटेल्स रात्रभर सुरू ठेवण्यासाठी कायद्यात बदल करावे लागतील. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय सभागृहात मांडला जाण्याची शक्यता आहे.
एकेकाळी नाइट लाइफ हे मुंबईचे वैशिष्ट्य होते; पण १९९२मधील दंगली, २६/११च्या हल्ल्यानंतर तसेच डान्सबार बंदीच्या निर्णयानंतर ते जवळपास बंद झाले. सध्या रेस्टॉरन्ट रात्री १२ पर्यंत तर पब आणि बार मध्यरात्रीनंतर एक वाजतापर्यंतच सुरू ठेवण्याची अनुमती आहे. डान्सबारवरील बंदी कायम ठेवण्याची भूमिका नवीन सरकारने घेतली. (विशेष प्रतिनिधी)