Join us  

खाद्यपदार्थ तळायच्या झाऱ्याने काढला गटारातील गाळ; मुंबईच्या प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 3:53 PM

Viral Video : मुंबईच्या कुर्ला परिसरातील एका हॉटेलचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai News : मुंबईत उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे अनेकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. काहींना तर उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्याने जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेकजण चांगल्या हॉटेलमध्ये जाण्याला पसंती देतात. मात्र या हॉटेलच्या किचनमध्ये किती स्वच्छता असते हा प्रश्नच आहे. पण याच प्रश्नाचे उत्तर देणारा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी हॉटेलमध्ये जेवायला जाताना नक्कीच काळजी घ्यायला हवी.

मुंबईतल्या कुर्ला परिसराती एका हॉटेलच्या किचनमधील धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये कुर्ल्यातील प्रसिद्ध हॉटेलमधील एक कर्मचारी नाल्यातील सांडपाण्याचा गाळ काढण्यासाठी चिकन तळण्याचा झारा वापरताना दिसत आहे. या भयानक दृश्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

 कुर्ला येथील हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याचे झाऱ्याने गटारातील गाळ काढला आणि तो एका बादलीत जमा केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. चिकन तळण्यासाठी वापरण्यात येणारा झाला हा नाल्यातील गाळ काढण्यासाठी वापरला गेल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. ही धक्कादाय घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून ती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे. दरम्यान, व्हिडीओ काढला जात असल्याचे पाहताच कर्मचारी तो तेथून कचरा घेऊन तिथून निघून जातो. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर हॉटेलमध्ये जेवणाऱ्यांनी संताप व्यक्त करून स्वच्छता आणि अन्न सुरक्षेबद्दलच्या चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शोर्मा खाल्ल्यानंतर प्रथमेश भोकसे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शोर्मा खाल्ल्यानंतर प्रथमेशला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याने जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. मात्र दोन दिवसांनी पुन्हा त्रास सुरु झाल्याने त्याला परळच्या केईएम रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर प्रथमेशला पुन्हा घरी पाठवण्यात आले. मात्र घरी आल्यानंतर प्रथमेशला अशक्तपणा जाणवू लागल्याने त्याला केईएममध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. या सगळ्या प्रकारानंतर महापालिकेने बेकायदेशीर खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर कारवाई देखील केली होती. 

टॅग्स :मुंबईसोशल व्हायरलगुन्हेगारीमुंबई पोलीस