Join us  

धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 5:34 PM

Mumbai Sion Hospital : मुंबईच्या सायन रुग्णालयाच्या आवारात एका वृद्ध महिलेला भरधाव कारने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.

Mumbai Crime : मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालय म्हणजेच सायन हॉस्पिटलमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारने धडक दिल्याने एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. सायन हॉस्पिटलच्या आवारात शुक्रवारी रात्री एका  कारने महिलेला धडक दिली. या धडकेत वृद्ध महिला जागीच मृत्यूमुखी पडली होती. शनिवारी पोलिसांनी याप्रकरणाची माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पुण्यात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवून दोघांची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत अशी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासानुसार, महिलेला रुग्णालयाच्या आवारात कारने धडक दिली. परंतु गुन्हा दाखल करण्यापूर्वी आम्ही रुग्णालयाच्या वक्तव्याची वाट पाहत आहोत, पोलिसांनी माहिती गोळा केली आहे. रुग्णालयाच्या आवारातच कार अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुसरीकडे रुग्णालयात आवारातच एका वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागल्याने आश्चर्च व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, या अपघातात मृत पावलेली महिला नेमकी कोण होती, कारने धडक कुणी दिली आणि अपघातानंतर कारचालक कुठे गेला असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांसमोर आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्याचे आव्हान असणार आहे.

नागपूरमध्ये अमली पदार्थाचे सेवन करुन तिघांना चिरडले

दुसरीकडे, नागपूरमध्येही पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. अंमली पदार्थाचे सेवन करुन कार चालवणाऱ्या तरुणाने तिघांना चिरडले. यामध्ये पती पत्नी आणि तीन महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. अपघातातीतल तिघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून चिमुकलीची प्रकृती चिंताजनक आहे. नागपूरच्या झेंडा चौकात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. रात्री साडेआठच्या सुमारास एका भरधाव कारने कोतवाली पोलीस स्टेशनच्या झेंडा चौक परिसरात बाईकवरुन चाललेल्या तिघांना धडक दिली. याप्रकरणी पोलिसांनी सन्नी सुरेंद्र चव्हाण (३७), अंशुल विजय ढाले (२४) आणि आकाश नरेंद्र महेरुलिया यांना अटक केली. सन्नी चव्हाण हा गाडी चालवत होता. त्यावेळी  सचिन सूर्यभान सुभेदार हे पत्नी व ३ महिन्यांच्या मुलीसह बाईकने जात होते. अमली पदार्थाचे सेवन केलेल्या सन्नीने सुभेदार यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या प्रकारानंतर संतप्त जमावाने आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीससायन हॉस्पिटल