Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पालिकेचे ‘एकच लक्ष्य, एक लक्ष’ पॅटर्न हिट; महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2023 11:45 IST

या पुरस्कारासाठी पालिकेने शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात असल्यामुळे गेल्या वर्षभरात एक लाखावर विद्यार्थी वाढले आहेत. शिवाय शिक्षणासाठी अनेक अद्ययावत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्यामुळे शिक्षण विभागाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. नवी दिल्ली येथील ‘राष्ट्रीय शैक्षणिक योजना’ एवं प्रशासन संस्थेकडून हा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी पालिकेने शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची निवड करण्यात आली आहे.

पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून सन २०२२- २३ या वर्षात पटसंख्या वाढवण्यासाठी ‘मिशन ॲडमिशन’  मध्ये ‘एकच लक्ष्य, एक लक्ष’ मोहीम राबवली. यामध्ये एक लाखांवर विद्यार्थी संख्या वाढली. यासह पालिकेच्या माध्यमातून शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा अहवाल राष्ट्रीय पुरस्काराकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. यानंतर केंद्र शासनाच्या स्तरावर महानगरपालिकेचे सादरीकरण व मुलाखतही घेण्यात आली होती. या सर्व स्तरावर सर्वोत्तम ठरल्याने पालिकेच्या शिक्षण विभागाला हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.

अशी वाढली पटसंख्या

महानगरपालिकेच्या आठ माध्यमांच्या १२१४ शाळा व ११३४ बालवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये १ लाख १८ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला.  महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दर्जेदार शिक्षण, विविध प्रकारच्या आंतरशालेय स्पर्धा, दर्जेदार मोफत सुविधा, सुसज्ज इमारत, क्रीडांगणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, सुरक्षा रक्षक, डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम, स्मार्ट बोर्ड, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, ॲस्ट्रॉनॉमी लॅब, ग्रंथालय, टॅब, शालेय स्टेशनरी, गणवेश, माध्यान्ह भोजन, संगीत-चित्रकला-नाट्य, कार्यानुभव, करिअर गायडन्स, स्काउट गाइड, आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आर्थिक साक्षरता असे उपक्रम राबवले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा पालिका शाळांकडे वाढला आहे.

महानगरपालिका शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, विभाग निरीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संगीत-चित्रकला-कार्यानुभव, क्रीडा, स्काउट गाइड विभाग, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी संघ भावनेतून दिलेल्या भरीव योगदानामुळे महापालिका शिक्षण विभागाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान होत आहे.- राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी

टॅग्स :शाळामुंबई महानगरपालिका