Join us

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार; निवडणूक प्रक्रियेला वेग, १ जुलैपर्यंतची यादीच ग्राह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 09:45 IST

प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींवर २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या हरकती, सूचना मागवण्यात आल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेची प्रभाग रचना ६ ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी जाहीर होणार आहे. पालिकेने तयार केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती, सूचना जाहीर घेण्यात आल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना  अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर आरक्षण सोडत आणि नंतरच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे.

प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींवर २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या हरकती, सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यावर  १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर हे तीन दिवस मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट, या ठिकाणी सुनावणी घेण्यात आली. मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध टप्पे निश्चित करण्यात आले असून, याअंतर्गत २२ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यावर आलेल्या हरकतींवर १० ते १२ सप्टेंबरदरम्यान नागरिकांनी प्रत्यक्षात उपस्थित राहून आपल्या हरकती आणि सूचना शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

जानेवारीपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. मुंबई महापालिकेकडून सर्व पातळ्यांवर नियोजन करण्यात आले आहे.  

आरक्षण सोडतीच्या कार्यवाहीला सुरुवातसुनावणीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १० सप्टेंबर रोजी १८९ सूचना आणि हरकती, ११ सप्टेंबर रोजी २७७ हरकती आणि सूचना, तसेच शुक्रवारी २८ सूचना व हरकतींवर सुनावणी झाली. तीन दिवसांच्या सुनावणी कार्यक्रमात  एकूण ४९४ हरकती व सूचनांवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली. या हरकतींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम केलेली प्रभाग रचना सोमवारी जाहीर होईल. प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Municipal Corporation Ward Structure to be Announced Today.

Web Summary : Mumbai's ward structure for municipal elections will be announced today. Objections were heard, and the final structure by the Election Commission will be notified. Election likely by January, voter list valid until July 1, 2025.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२५