मुंबई - मुंबई पालिकेच्या वॉर्ड रचना प्रारूप आराखड्यात वॉर्डांची संख्या २२७ कायम ठेेवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना वॉर्डांची संख्या २२७ वरून २३६ एवढी करण्यात आली होती. त्यास भाजपने आक्षेप घेतला होता.
दरम्यानच्या काळात शिवसेना फुटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट निर्माण झाल्याने ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. या सरकारने बदललेली वॉर्ड रचना पूर्ववत केली. त्याला ठाकरे गटाने न्यायालयात आव्हान दिले. वॉर्डरचनेचा वाद आणि ओबीसी आरक्षण या दोन मुद्द्यांमुळे पालिका निवडणुका रखडल्या. त्यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते.
हरकती नोंदवासर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, त्या दृष्टीने मुंबई महापालिकेने वॉर्डांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. त्या सादर करण्यासाठी ४ सप्टेंबर, दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत आहे.