मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मुदतठेवी २०२२ मधील ९१ हजार कोटी रुपयांवरून घटून ८१ हजार कोटी रुपयांपर्यंत आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. तसेच, मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामातील सुमारे ६५ कोटी रुपयांचा घोटाळा आतापर्यंत समोर आला असून, आणखी तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
मिठीतील गाळ काढण्याचे काम २०१२ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पालिकेकडे सोपवले होते. त्यानंतरच्या चौकशीत ६५ कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला. काम पूर्ण झाल्याचे पुरावे, म्हणून सादर केलेल्या सुमारे ३.५ लाख छायाचित्रांची तपासणी सुरू असून, २ लाख छायाचित्रे स्कॅन केली आहेत. अनेक ठिकाणी एकाच डम्पर व ट्रॅक्टरचा वापर करून नदीतील गाळ वारंवार काढल्याचे दाखवले गेले, त्यामुळे घोटाळ्याचा संशय आहे. उर्वरित छायाचित्रे स्कॅन करण्यास अजून काही वेळ लागेल, असे तपास यंत्रणांनी सांगितल्याचे सामंत यांनी नमूद केले.
सुशोभीकरणातही गैरप्रकार
१,२०० कोटी रुपयांच्या स्ट्रीट फर्निचर प्रकल्पातही अनियमिततेचे आरोप असल्याचा उल्लेख मंत्री सामंत यांनी केला. शहर सुशोभीकरण आणि बॅरिकेडिंगच्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय असून, यासंबंधीचा ३८० कोटी रुपयांचा पुढील निविदा प्रस्ताव सरकारने रद्द केल्याचेही सामंत यांनी सांगितले. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केतन कदम कोण आहेत?
मिठी नदी घोटाळ्यात आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. “सध्या आम्हाला अधिक तपशील द्यायचे नाहीत; परंतु केतन कदम कोण आहे आणि त्याचे किती नाइट बार आहेत, हे सर्वांना माहीत आहे. तसेच सॅन्टिनो मोरे बद्दलही आम्ही सध्या काही बोलत नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर भ्रष्टाचाराचे आणखी तपशील समोर येतील,” असे सामंत म्हणाले.
Web Summary : Mumbai municipality deposits decreased from ₹91,000 crore to ₹81,000 crore. A ₹65 crore scam in Mithi River desilting was revealed, with investigations ongoing. Irregularities are suspected in the ₹1,200 crore street furniture project. Twelve arrests made; further details awaited.
Web Summary : मुंबई पालिका की जमा राशि ₹91,000 करोड़ से घटकर ₹81,000 करोड़ हुई। मीठी नदी गाद निकालने में ₹65 करोड़ का घोटाला सामने आया, जांच जारी है। ₹1,200 करोड़ के स्ट्रीट फर्नीचर प्रोजेक्ट में अनियमितताओं का संदेह है। बारह गिरफ्तार, आगे के विवरण का इंतजार।