Join us  

मुंबई महापालिकेने पाणीपट्टी वाढ रद्द करावी, अन्यथा आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 5:56 AM

मुंबई महापालिकेने पाणीपट्टीमध्ये ७.१२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने पाणीपट्टीमध्ये ७.१२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे. काँग्रेसनेही ही पाणीपट्टी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पाणीपट्टी वाढ रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी गुरुवारी दिला.

मुंबई महापालिकेकडून पाणीपट्टी वाढ जून २०२२ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. अगोदरच इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी यांसारख्या समस्यांमुळे मुंबईकर त्रस्त असताना पाणीपट्टी वाढ करण्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे ही करवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अन्यथा मुंबई काँग्रेस मुंबईकरांसाठी महापालिका प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा भाई जगताप यांनी दिला.  

सोमय्या मैदानावर साजरा होणार काँग्रेस स्थापना दिन  काँग्रेसतर्फे २८ डिसेंबर रोजी सोमय्या मैदानावर काँग्रेस स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या कार्यक्रमाला काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस व खासदार के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, खासदार इम्रान प्रतापगढी आणि काँग्रेस नेते कन्हय्या कुमार उपस्थित राहणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअशोक जगतापकाँग्रेस