Join us
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहनेतेपदी शिंदे की खणकर; उत्सुकता शिगेला, ज्येष्ठ की आक्रमक पवित्राला देणार पसंती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:17 IST

Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिकेतील सभागृहनेतेपदी कोण विराजमान होणार यासंदर्भात खुद्द भाजपमध्येच उत्सुकता आहे. सभागृह नेतेपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि गणेश खणकर या दोघांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

मुंबई - मुंबई महापालिकेतील सभागृहनेतेपदी कोण विराजमान होणार यासंदर्भात खुद्द भाजपमध्येच उत्सुकता आहे. सभागृह नेतेपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि गणेश खणकर या दोघांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

मुंबई महापालिकेत भाजप - शिवसेना महायुतीचा महापौर विराजमान होईल हे आता जवळपास निश्चित झाले असून, सत्ता समीकरणांनुसार सभागृह नेतेपद भाजपच्या पारड्यात जाणार आहे. या महत्त्वाच्या पदासाठी भाजपमध्ये सध्या दोन प्रमुख नावांची जोरदार चर्चा सुरू असून, अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे की आक्रमक गणेश खणकर, यापैकी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिंदे यांनी यापूर्वी सभागृह नेतेपद भूषवले आहे. ते या पदासाठी योग्य उमेदवार मानले जातात. मात्र, पक्षासमोर पेच असा आहे की, शिंदेंना सभागृह नेते केले, तर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी त्यांच्याइतकाच अनुभवी चेहरा शोधणे कठीण जाईल. शिंदेंनी स्थायी समितीचे अध्यक्षपद सांभाळावे, असा एक मोठा गट पक्षात सक्रिय आहे. दुसरीकडे, भाजपचे प्रवक्ते आणि सरचिटणीस गणेश खणकर यांचेही नाव सभागृह नेतेपदासाठी पुढे येत आहे. खणकर यांनी यापूर्वी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केले असून, त्यांना कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. प्रशासकीय कामावरील पकड आणि अभ्यासू स्वभाव ही खणकर यांची जमेची बाजू मानली जात आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या राजकीय टीकेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी खणकर आणि शिंदे हे दोघेही भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतात.

स्थायी समिती अध्यक्षपदी हवी खमकी व्यक्तीस्थायी समिती अध्यक्षपदासाठी मकरंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांच्या कुटुंबात अनेक पदे दिली गेल्याने तो एक चर्चेचा विषय झाला आहे. अशा परिस्थितीत प्रभाकर शिंदे यांना सभागृह नेतेपद मिळाल्यास, स्थायी समितीसाठी राजश्री शिरवडकर, हरिश भांदिर्गे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. शिरवडकर यांची महापौरपदी निवड झाली, तर भांदिर्गे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र स्थायी समिती अध्यक्षपदी खमकी व्यक्ती असणे गरजेचे ठरणार आहे.

उपमहापौरपदाची माळ लांडे की कातेंच्या गळ्यात?शिंदेसेनेने भाजपसोबत युती केल्यास उपमहापौर त्यांच्या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी समृद्धी काते आणि शैला लांडे यांची नावे पुढे आहेत. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाच्या बाजूने दान टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. समृद्धी या आ. तुकाराम काते यांच्या सुनबाई आहेत, तर शैला लांडे या आ. दिलीप (मामा) लांडे यांच्या पत्नी आहेत. यांपैकी लांडे हे आधी शिवसेनेत होते. त्यानंतर ते मनसेत गेले आणि मग शिंदेसेनेत स्थिरावले. आता ते शिंदेसेनेचे (चांदिवली) आमदार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Faces Dilemma: Shinde or Khankar for Key Mumbai Post?

Web Summary : Mumbai BJP debates between Prabhakar Shinde and Ganesh Khankar for key BMC leader post. Shinde's experience versus Khankar's aggression is the core dilemma. Deputy Mayor post contenders include Samruddhi Kate and Shaila Lande.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई