Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा महापालिका नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करु शकतो; काय आहे नियम, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 20:43 IST

नारायण राणे यांच्या बंगल्यात महापालिकेने मंजूर केलेल्या बांधकामाव्यतिरीक्त बेकायदा बदल करण्यात आले असल्याची तक्रार आली होती.

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील 'अधिष' बंगल्याला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यानुसार पालिकेच्या के पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांचे पथक पोलिस ताफ्यासह शुक्रवारी सायंकाळी बंगल्यावर पोहोचले होते. परंतु, दहा मिनिटांतच हे पथक माघारी परतले असून सोमवारी पुन्हा बंगल्याची पाहणी केली जाणार आहे. 

नारायण राणे यांच्या बंगल्यात महापालिकेने मंजूर केलेल्या बांधकामाव्यतिरीक्त बेकायदा बदल करण्यात आले असल्याची तक्रार आली होती. इमारतीचे बांधकाम करताना पालिकेकडून आराखडे मंजूर करुन घ्यावे लागतात. या मंजूर आराखड्यानुसारच बांधकाम नसल्यास ते बेकायदेशीर ठरविले जाते. त्यामुळे या तक्रारीची दखल घेत पालिकेच्या के पश्चिम विभागाने बंगल्याचे मालक असलेले नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार पालिकेच्या पथकामार्फत बंगल्याची पाहणी व मोजमाप करण्यात येईल, असे त्यांना नोटिसीमधून कळविण्यात आले होते. 

तत्पूर्वी स्थानिक पोलीस ठाण्याकडे पालिकेच्या पथकाने संरक्षण मागितले होते. पोलीस ताफा पुरविण्यात आल्याने शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पालिकेचे पथक बंगल्यावर पोहोचले. मात्र, बंगल्यात उपस्थित सदस्यांनी या पथकाला सोमवारी येण्याची विनंती केली. त्यामुळे आता पालिकेचे पथक पुन्हा बंगल्याच्या तपासणीसाठी जाणार असल्याचे, पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

असा आहे नियम... 

बंगल्यात बेकायदेशीर बदल असतील मात्र चटईक्षेत्र निर्देशांकाचे उल्लंघन झाले नसल्यास पालिका कायद्यानुसार दंड आकारुन बांधकाम नियमित करता येईल. मात्र यावर कारवाईच करण्याची भूमिका पालिकेने घेतल्यास सदर बेकायदेशीर बदल स्वतः पाडण्याची मुदत राणे यांना नोटीसद्वारे दिली जाऊ शकते. त्या मुदतीत बेकायदेशीर बदल न हटविल्यास पालिकेमार्फत कारवाई होऊ शकते. तसेच वेळ पडल्यास विशेष अधिकार वापरुन २४ ते ७२ तासांच्या कालावधीत नोटीस देऊन बेकायदा बांधकामावर पालिकेमार्फत कारवाई करु शकते.

शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटला... 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर घोटाळ्याचे आरोप केले. त्यास भाजपच्या वतीने राणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर तोफ डागली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्या कथित बंगल्याचा शोध घेण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या शुक्रवारी अलिबागमध्ये गेले आहेत. त्याचवेळी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेच्या पथक नारायण राणे यांच्या बंगल्यावर धडकले आहेत. 

टॅग्स :नारायण राणे मुंबई महानगरपालिका