Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मनपा जी उत्तर वॉर्ड; अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेले पादचारी, झोपडपट्टी पुनर्वसन कळीचे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 10:44 IST

जी उत्तर वॉर्ड अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात.

दादर फूल, भाजी बाजार, प्लाझा मार्केट, माटुंगा, माहीम, सायन वांद्रे लिंक रोड आणि धारावी परिसरात भर रस्त्यात उभे राहणारे अनधिकृत फेरीवाले आणि पदपथावर त्यांनी मांडलेल्या बाजारामुळे नागरिकांना पादचारी मार्गावर चालणे कठीण झाले आहे. फेरीवाल्यामुळे होणारे वाद, शिवसेना भवन, राजगड, शिवाजी पार्क मैदानातील राजकीय घडामोडींनी जी-उत्तर महापालिका प्रभाग नेहमीच चर्चेत राहतो. येथील चौपाटी, शीतलादेवी, माहीम दर्गा पर्यटनस्थळ पाहण्यासाठी गर्दी असते. मात्र, भररस्त्यात फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून हडप केलेले पादचारी मार्ग आणि मेट्रोच्या कामाने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या विखळ्यात जी-उत्तर प्रभाग सापडला आहे.

हद्द-पूर्व-पश्चिम :

उत्तर : माहीम काॅजवे, रेतीबंदरदक्षिण : दादर-माहीम चौपाटीपूर्व : धारावी, माटुंगा पश्चिम : दादर, प्रभादेवी

वॉर्डाचे वैशिष्ट्य : या वॉर्डात शिवाजी पार्क मैदान, राजगड आणि शिवसेना भवन आहे. त्यामुळे हा परिसर नेहमी राजकीयदृष्ट्या संवेदनशील असतो.

दादर फूल मार्केट, भाजी मंडई, प्लाझा सर्कल, माटुंगा मासळी बाजार, माहीम चर्च मार्केट, दर्गा बाजार, काळा किल्ला, धारावी ९० फूट रोड अशा सर्वच रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे.

येथे सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी, शिवाजी पार्क मैदान, शीतलादेवी मंदिर, माहीम दर्गा अशी धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे नेहमी येथे गर्दी असते.  सर्वाधिक मोठी झोपडपट्टीबहुल धारावीचे काही प्रभाग या वॉर्डात आहेत. त्यामुळे जमिनीवरील अतिक्रमण, पालिकेविरोधातील मोर्चे, आगी लागणे अशा घटना नेहमी येथे होत असतात.

महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :

बब्बू खान : वॉर्ड क्र. १८४थैवलपिल मक्कुनी : वॉर्ड क्र. १८५वसंत नकाशे : वॉर्ड क्र. १८६मरिअम्माल थेवर : वॉर्ड क्र. १८७रेशमाबानो खान : वॉर्ड क्र. १८८हर्षला मोरे : वॉर्ड क्र. १८९शीतल देसाई : वॉर्ड क्र. १९०विशाखा राऊत : वॉर्ड क्र. १९१प्रीती पाटणकर : वॉर्ड क्र. १९२

प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग :

जी उत्तर प्रभागात सर्वांत मोठे बाजार आहेत. त्यामुळे येथील अनधिकृत फेरीवाले हीच मोठी समस्या आहे. अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे प्रभागात ही समस्या जटिल आहे.

शैक्षणिक संस्था : रूपारेल कॉलेज, कीर्ती महाविद्यालय

पर्यटन स्थळे : दादर चौपाटी, शिवाजी पार्क मैदान, चैत्यभूमी, माहीम किल्ला, शीतलादेवी मंदिर, माहीम दर्गा

रुग्णालये : १० डिस्पेन्सरी ,हिंदुजा रुग्णालय, सुश्रुषा, रहेजा रुग्णालय, छोटा सायन रुग्णालय

मुख्य समस्या :

धारावी झोपडपट्टीचे पुनर्वसन हा कळीचा मुद्दा या वॉर्डात आहे. माहीम, माटुंगा आणि दादरपर्यंत भूमिगत मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे पाच वर्षांपासून येथील मार्गांवर वाहतूककोंडी होते. त्यामुळे २० मिनिटांच्या प्रवासाला अनेक तास लागतात. अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेले पादचारी मार्ग, माहीम किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामे, असे प्रश्न या वॉर्डात आहेत.

टॅग्स :मुंबईधारावी