Join us  

मुंबई मान्सूनलॉक; पहिल्याच पावसाने केले गारद : लोकल, बेस्टसह सर्व यंत्रणा कोलमडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 6:39 AM

Monsoon : पहिल्याच पावसात अत्यावश्यक सेवेसाठी धावणारी लोकल वाहतूक बंद पडली. रस्तेही पाण्याखाली गेल्याने बेस्ट, टॅक्सी, रिक्षांसह सार्वजनिक वाहतूक कोलमडल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.

मुंबई :  अतिवृष्टीचा इशारा सोबत घेऊन आलेल्या मान्सूनने एन्ट्रीलाच मुंबईसह महामुंबई परिसराला जोरदार दणका दिला. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व सरींचे आल्हाददायक स्वरूप बुधवारी सकाळपर्यंत मान्सूनमध्ये कधी परावर्तित झाले, हे मुंबईकरांना कळायच्या आतच मुसळधार ते अतिमुसळधार सरींनी मुंबईला झाेडपून काढले.       पहिल्याच पावसात अत्यावश्यक सेवेसाठी धावणारी लोकल वाहतूक बंद पडली. रस्तेही पाण्याखाली गेल्याने बेस्ट, टॅक्सी, रिक्षांसह सार्वजनिक वाहतूक कोलमडल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. दिवसभर मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने निर्बंध शिथिल झाल्यानंतर हळूहळू गजबजू लागलेली मुंबई मान्सूनमुळे पुन्हा लॉक झाली. 

दहा तासांनी मध्य रेल्वेची वाहतूक सुरूपाणी साचल्यामुळे रेेल्वेसह रस्ते वाहतूकही विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला ते सायनदरम्यानच्या ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानची रेल्वे वाहतूक बंद पडली होती. बुधवारी सकाळी ९.५० च्या दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरील बंद झालेली रेल्वे वाहतूक संध्याकाळी ७.४५ वाजता म्हणजे जवळपास दहा तासांनी सुरळीत झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवरही पाणी साचल्याने बेस्टच्या गाड्यांसह इतर खासगी वाहनांच्या वेगही मुंबईत दिवसभर मंदावलेला राहिला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आढावापंपिंग स्टेशन्स कार्यान्वित राहून साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा होईल, याची खात्री करून घ्यावी, जोरदार पावसामुळे वाहतूक मंद किंवा थांबलेली असल्यास तिथे पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित अडथळे दूर करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना बुधवारी दिली. मुंबईतील परिस्थितीचा आढाव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दुपारी भेट दिली. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासह विविध कार्यवाहीबाबत त्यांनी निर्देश दिले. 

अनेकांच्या घरात शिरले पाणी; वाहतूकही मंदावलीठाणे जिल्ह्यात पावसामुळे अनेक शहरांसह ग्रामीण भागात मुख्य रस्त्यांसह चौकाचौकांमध्ये पाणी तुंबले, तसेच गटारे व नाल्यांची सफाई व्यवस्थित न झाल्याने दिवा, मुंब्रा, कल्याण पूर्व, भिवंडी शहरातील अनेक घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. भिवंडी-मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक मंदगतीने सुरू 

नाल्यात पडून मुलगा जखमी, वृक्ष कोसळले, संरक्षक भिंत पडली.पनवेलसह नवी मुुंबईलाही बुधवारी पावसाने झोडपले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये पाणी साचले होते. तुर्भे इंदिरानगरमध्ये नाल्यात पडून एक मुलगा जखमी झाला. काही ठिकाणी वृक्ष कोसळले, तर एका ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली. होती.

शहरात जनजीवन विस्कळीत; शेतकरी मात्र सुखावलेपालघर जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाने शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असले तरी ग्रामीण भागातील शेतकरी सुखावल्याचे चित्र दिसून आले. 

एक जण बुडालाकुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूला मासेमारी करण्यासाठी गेलेला एक जण वाहून गेला आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दिनेश हरी राक्षीकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

घर कोसळलेपेण तालुक्यात एक बंद घर पावसामुळे काेसळले, तर मुंबई-गाेवा महामार्गावरील खराब रस्त्यांमुळे पाेलादपूर येथे वाहतूककाेंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला.

टॅग्स :मुंबईपाऊस