मुंबई मान्सूनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:37+5:302021-06-10T04:06:37+5:30

पहिल्याच पावसाने केले गारद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मान्सूनने एन्ट्रीलाच मुंबईकरांना जोरदार दणका दिला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू ...

Mumbai Monsoon Lock | मुंबई मान्सूनलॉक

मुंबई मान्सूनलॉक

Next

पहिल्याच पावसाने केले गारद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मान्सूनने एन्ट्रीलाच मुंबईकरांना जोरदार दणका दिला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व सरींचे स्वरूप बुधवारी सकाळी मान्सूनमध्ये कधी परावर्तित झाले, हे मुंबईकरांना कळायच्या आतच मुसळधार ते अतिमुसळधार सरींनी मुंबईला झाेडपून काढले. या पहिल्याच पावसात लोकलपासून बेस्टसह उर्वरित यंत्रणा कोलमडल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम राहिल्याने नुकतेच निर्बंध शिथिल झाल्यानंतर हळूहळू गजबजू लागलेल्या मुंबईला मान्सूनने लॉक केले.

बुधवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून साडेअकरा वाजेपर्यंत सांताक्रूझ वेधशाळेत १०२ मिलिमीटर पावसाची, तर दिवसभरात २२०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने दिली.

मुंबईकरांची बुधवारची पहाट काळ्याकुट्ट ढगांनी उजाडली. तेजस्वी भास्कर केव्हाच ढगांच्या आड लपला होता आणि वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत असलेले ढग मुंबईला अक्षरशः कवेत घेत होते. पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा मारा बुधवारी सकाळचे अकरा वाजले तरी सुरूच होता. या काळात दक्षिण मुंबईपासून दक्षिण-मध्य मुंबई आणि मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांत पावसाने रौद्ररूप धारण केले हाेते. बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, अंधेरी, कुर्ला, मानखुर्द आणि पवई अशा उपनगरांतल्या विविध ठिकाणी दाखल झालेल्या मान्सूनने मुंबईकरांना दणका दिला. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमधील रस्ते यामुळे जलमय झाले.

बाजारपेठा सामसूम

निर्बंध शिथिल झाल्यानंतर साेमवारपासून मुंबईच्या भरभरून वाहणाऱ्या बाजारपेठा बुधवारी मात्र मुसळधार पावसामुळे सामसूम झाल्या होत्या. किंचित झालेली गर्दी वगळली तर मुंबईच्या रस्त्यांवर केवळ पावसाचा धिंगाणा सुरू होता. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडलेले नागरिक वगळता मुंबईत सकाळी तशी फार गर्दी नव्हती. सकाळी साडेअकरा वाजता पावसाने किंचित विश्रांती घेतली. मात्र, पुन्हा दुपारी बारा वाजता रौद्ररूप धारण केले. मुंबईच्या उपनगरांत दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडू लागला.

लालबहादूर शास्त्री मार्गावरदेखील कुर्ला येथील शीतल सिनेमा, कमानी जंक्शन आणि कुर्ला डेपो येथे रस्त्यावरून पाण्याचे अक्षरश: धबधबे वाहत हाेते. आंबेडकर रोड आणि लालबहादूर शास्त्री मार्ग पावसाच्या पाण्याने भरून वाहत हाेते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर येथील हिंदमाता आणि माटुंगा येथील गांधी मार्केट परिसरात पहिल्याच पावसात पाणी साचण्यास सुरुवात झाली.

रस्ते पाण्याखाली गेले. दुसरीकडे रेल्वे वाहतुकीनेही नांगी टाकली. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल धावत असतानाच मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला ते सायनदरम्यानच्या ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानची रेल्वे वाहतूक बंद पडली. रेेल्वेसह रस्ते वाहतूकही विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

...................................................

लाइफलाइन पाण्यात; प्रवासी बेहाल

पाणी साचल्यामुळे रेेल्वेसह रस्ते वाहतूकही विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला ते सायनदरम्यानच्या ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानची रेल्वे वाहतूक बंद पडली. बेस्टलाही रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. सायनपासून कुर्ला आणि इतर रेल्वेस्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांनी अखेर बेस्ट, टॅक्सी, रिक्षासारख्या पर्यायी वाहनांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रवासही त्यांच्यासाठी दिलासादायक नव्हता. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दादर येथील हिंदमाता आणि माटुंगा येथील गांधी मार्केट हे दोन भाग दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाच्या पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. मुळात आंबेडकर रोड हा मध्य रेल्वेला सायनपर्यंत समांतर असा रोड आहे. मात्र, या दोन्ही प्रवासात प्रवाशांना अडथळे आले. मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला येथील कमानी, शीतल आणि कुर्ला डेपो येथील सखल भागात पावसाचे पाणी साचले. परिणामी येथील वाहतूक काही काळ बंद हाेती, तर काही काळ धीम्या गतीने सुरू होती.

विमानांच्या लँडिंगमध्ये अडथळे

मुंबई विमानतळालाही बुधवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका बसला. कमी दृश्यमानतेमुळे ३ विमानांना लँडिंग करण्यात अडचणी आल्या. ‘गो अराउंड’ केल्यानंतर ही विमाने सुरक्षितरीत्या धावपट्टीवर उतरवण्यात आली.

असा कोसळला पाऊस

२४ तासांचा पाऊस (मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी सकाळी ८)

कुलाबा ७७.४ मिमी

सांताक्रूझ ५९.६ मिमी

---------------

शहर ४९.६५ मिमी

पूर्व उपनगर ६८.०५

पश्चिम उपनगर ४८.८३

---------------

२०२१ पावसाची टक्केवारी

कुलाबा ६

सांताक्रूझ ७.२३

Web Title: Mumbai Monsoon Lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.