Join us

पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 05:58 IST

सव्वा लाख पदव्यांवर चुकीचे स्पेलिंग

अमर शैला

मुंबई :मुंबई विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्रावर विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील मुंबईच्या नावातील स्पेलिंगमधील चुकीबद्दल कंत्राटदाराला जबाबदार धरत दंड ठोठावला आहे. कंत्राटाच्या एकूण रकमेच्या २० टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे. विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर केलेल्या कारवाईला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ ७ जानेवारीला झाला होता. त्यानंतर विद्यापीठाने जवळपास १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या. कॉलेजांनी पदव्या प्रदान केल्यानंतर त्यावर विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील मुंबईच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाल्याचे समोर आले. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्रे पुन्हा घेतली. त्यातून विद्यापीठाची नाचक्की झाली. तपासणीत जवळपास १ लाख ६४ पदवी प्रमाणपत्रांवर संबंधित चूक आढळली. चौकशी समितीने कंत्राटदाराला जबाबदार धरले.

कंत्राटदाराने पदवीदान समारंभासाठी दिलेल्या पदव्यांवर कोणत्याही चुका नव्हत्या. दुसऱ्या टप्प्यात छपाई करण्यापूर्वी कंत्राटदाराने त्याची प्रत विद्यापीठाकडून तपासली नाही. तशीच छपाई केली, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता, याला दुजोरा दिला.

विद्यापीठ केवळ कंत्राटदाराला दंड करून जबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे. विद्यापीठाने पैसे वसूल केले असले तरी या चुकीमुळे विद्यापीठाची गेलेली पत कशी भरून निघणार आहे. याप्रकरणात जबाबदारी निश्चित होऊन कारवाई व्हावी, अशी मागणी युवासेना नेते आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली.

गोपनीयतेचे कारण देत अहवाल नाकारला

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत गोपनीय असल्याने अहवाल देता येणार नाही, असे प्रशासनाने सांगितले. विद्यापीठाच्या इतिहासात कधीही व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांवर विद्यापीठाने अविश्वास दाखविला नव्हता.  विद्यापीठ अहवाल लपवून कोणाला तरी पाठीशी घालत आहे. कंत्राटदाराला एकूण कंत्राट रकमेच्या २० टक्के किंवा १० लाख यापैकी अधिक दंड ठोठावला आहे, अशी माहिती युवासेनेच्या नेत्या, व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. शीतल शेठ - देवरुखकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबई