Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आता भाजपची सत्ता, राज ठाकरेंना भोजपुरी शिकावी लागणार"; परप्रांतियाच्या मुजोरीवर मनसेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:43 IST

मुंबईतल्या निकालानंतर एका परप्रांतियाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र लढलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले  तरी एका मुजोर परप्रांतियाने चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. "आता भाजपची सत्ता आल्यामुळे राज ठाकरेंनाही भोजपुरी शिकावी लागेल," असे वादग्रस्त वक्तव्य या व्यक्तीने केले होते. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच मनसे सैनिकांनी या इसमाला गोरेगाव येथून पकडून चांगलाच धडा शिकवला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधुंविरोधात महायुतीने सत्ता काबीज केली. या निकालाचा आधार घेत एका परप्रांतियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत म्हटले की, मुंबईत आता भाजपची सत्ता आली आहे, त्यामुळे आता राज ठाकरेंना भोजपुरी शिकावी लागणार." इतकेच नव्हे तर, मराठीच्या सक्तीबद्दल बोलताना, पाच वर्षांत वाटले तर मराठी शिकू, अशी मुजोरीही त्याने केली होती.

काय म्हटलं व्हायरल व्हिडीओमध्ये?

"आता मुंबईत भोजपुरीचे राज्य चालणार आहे कारण भाजप सत्तेत आली आहे. युपी बिहारवाल्यांमुळे राज ठाकरे राज्यातून गायब झाले. आता पाच वर्षे उरली आहेत. शक्य झालं तर मराठी शिकू. नाहीतर भाजप आहे तोपर्यंत भोजपुरीच चालेल. आम्ही युपी बिहारवाले आहोत ज्याला पाहिजे त्याला पंतप्रधान बनवू. नाहीतर नकाशावरुन गायब करु शकतो. आता भाजपचे राज्य आहे त्यामुळे राज ठाकरेंनाही भोजपुरी शिकावे लागेल," असं परप्रांतिय व्यक्ती व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. 

गोरेगावात पकडले

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर मनसे सैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. गोरेगाव येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी तातडीने या व्यक्तीचा शोध सुरू केला.  परप्रांतीय पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, कार्यकर्त्यांनी त्याला गोरेगाव परिसरातून पकडले.

"मुंबई पालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागायचे ते लागले. पण यानंतर एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर एका व्यक्तीने पोहोचवले. राज ठाकरे यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन या व्यक्तीने विधान केले. व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो घाबरला आणि आज पळून जात होता. पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला पकडलं आणि जो काही प्रसाद द्यायचा तो दिला. राज ठाकरे यांच्यावर कोणतेही आक्षेपार्ह विधान आम्ही सहन करणार नाही," असं स्थानिक मनसे पदाधिकारी भूषण फडतरे यांनी म्हटलं.

त्यानंतर बोलताना "मी राज ठाकरे यांची माफी मागतो. मला कोणीतरी चिथावणी दिली होती त्यामुळे मी व्हिडीओ तयार केला. मी मनाने हे केले नाही. पुन्हा अशी चूक होणार नाही," असं परप्रांतियाने म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : MNS warns against insolence after BJP win; Raj Thackeray targeted.

Web Summary : After BMC election results, a non-Maharashtrian insulted Raj Thackeray, saying he'd learn Bhojpuri under BJP rule. MNS workers caught him in Goregaon and taught him a lesson. The man apologized, claiming incitement.
टॅग्स :मुंबईराज ठाकरेमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६मराठी