कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई मेट्रोची बी रिस्पॉन्सिबल, बी सेफ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:07 AM2021-02-24T04:07:05+5:302021-02-24T04:07:05+5:30

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता आता मुंबई मेट्रो प्रशासनदेखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर ...

Mumbai Metro's B Responsible, B Safe campaign to prevent corona infection | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई मेट्रोची बी रिस्पॉन्सिबल, बी सेफ मोहीम

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई मेट्रोची बी रिस्पॉन्सिबल, बी सेफ मोहीम

Next

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता आता मुंबई मेट्रो प्रशासनदेखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नाका-तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका व पोलिसांच्या वतीने विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हेच लक्षात घेता आता मेट्रो प्रवासात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवरदेखील मेट्रो प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रोच्या ‘बी रिस्पॉन्सिबल, बी सेफ’ मोहिमेअंतर्गत आता ही कारवाई करण्यात येणार आहे.

सध्या मुंबई मेट्रोचा दिवसाला २५६ फेऱ्या सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यात मेट्रोमधून एक लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. लोकल सुरू झाल्यापासून या प्रवाशांमध्येदेखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने गर्दीच्या ठिकाणी अधिक खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

यासाठीच आता मेट्रो प्रशासनाने ‘बी रिस्पॉन्सिबल, बी सेफ’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रवाशांना सतत मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व मेट्रो स्थानकांवर याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी मेट्रोच्या डब्यांमध्ये तसेच स्थानकांवर मेट्रो प्रशासनाच्या वतीने विशेष लक्ष देण्यात येणार आहे. एखादा प्रवासी विनामास्क आढळल्यास त्याला पहिल्यांदा सूचित करण्यात येईल आणि तरीही तो न ऐकल्यास त्या प्रवाशावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मेट्रो प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Web Title: Mumbai Metro's B Responsible, B Safe campaign to prevent corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.