मुंबई मेट्रो- वनही सतर्क, दररोज रात्री मार्गिकेसह डब्यांची होणार सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:42 IST2020-03-06T05:42:23+5:302020-03-06T05:42:27+5:30
मेट्रो स्थानकांमध्ये आणि मेट्रोच्या डब्यांमध्ये दररोज रात्री मेट्रो सेवा बंद झाल्यावर साफसफाई करण्यात येणार असल्याचे मुंबई मेट्रोने सांगितले.

मुंबई मेट्रो- वनही सतर्क, दररोज रात्री मार्गिकेसह डब्यांची होणार सफाई
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर ते वर्सोवादरम्यान सुरू असलेल्या मेट्रो वन मार्गिकेवर मुंबई मेट्रोने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या मार्गिकेवर, मेट्रो स्थानकांमध्ये आणि मेट्रोच्या डब्यांमध्ये दररोज रात्री मेट्रो सेवा बंद झाल्यावर साफसफाई करण्यात येणार असल्याचे मुंबई मेट्रोने सांगितले.
कोरोना व्हायरसचा प्रसार हा सार्वजनिक ठिकाणांहून होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोतील डबे, स्थानकांवरील साफसफाईसह तिकीट काउंटर, लिफ्ट्स, एस्केलेटर तसेच प्रवाशांच्या संपर्कात येणारे क्षेत्र आणि रेलिंग्ज साफ करण्यात येणार आहेत. शौचालयांमध्ये सतत स्वच्छता आणि आवश्यकतेनुसार धूरफवारणीही करण्यात येणार आहे. याशिवाय मेट्रो-१ मार्गिकेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता राखण्यास सांगण्यात आले असून, प्रशिक्षण देण्यात येत आहे.