Join us  

मुंबई मेट्रो : कोरोनामुळे रखडल्या नियुक्त्या; उमेदवार मेटाकुटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 1:20 AM

सरकार आदेश देईपर्यंत एमएमआरडीएलाही सदर उमेदवारांशी काहीच पत्रव्यवहार करता येत नसल्याने नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले हे उमेदवार मेटाकुटीला आले आहेत.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नॉन एक्झिक्युटिव्ह पदाकरिता निवड झालेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना कोरोनाचा फटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मराठा आरक्षणावर स्थगिती आणली आहे. परिणामी, सरकार आदेश देईपर्यंत एमएमआरडीएलाही सदर उमेदवारांशी काहीच पत्रव्यवहार करता येत नसल्याने नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले हे उमेदवार मेटाकुटीला आले आहेत.एमएमआरडीएने ९ सप्टेंबर, २०१९ रोजी नॉन एक्झिक्युटिव्ह पदाकरिता विविध प्रवर्गातून १ हजार ५३ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यासाठी २० नोव्हेंबर, २०१९ ते २९ नोव्हेंबर, २०१९ या कालावधीत सीबीटी परीक्षा घेण्यात आल्या. डिसेंबर, २०१९ मध्ये निकाल लागले. जानेवारी, २०२० ते फेब्रुवारी, २०२० या कालावधीत प्रवर्गनिहाय कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली. ६ मार्च, २०२० पर्यंत काही उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करत नियुक्तीपत्र देण्यात आले. ८ मार्च, २०२० रोजी स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन आॅपरेटर या पदांची ४२ उमेदवारांची एक बॅच हैदराबादला प्रशिक्षणासाठी गेली. मार्च महिन्यात कोरोनामुळे उर्वरित उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही. त्यात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर स्थगिती आली. मार्च महिन्यात ज्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मार्गास प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. न्यायालयाच्या स्थगितीपूर्वी नियुक्तीपत्र देण्यात आल्याने पुढील प्रक्रिया होणे गरजेचे आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मेट्रो