Join us

मुंबईचा पारा १७ अंशांवर!; मोसमातील नीचांक, आजपासून दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 07:42 IST

१० जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहील

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईच्या किमान तापमानात घसरण होत असून, शनिवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या मोसमातील किमान तापमानाचा हा आतापर्यंतचा नीचांकी आकडा  आहे. तर ७ आणि ८ जानेवारीपासून रात्री आणि पहाटे थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. ७ ते ९ जानेवारी यादरम्यान मुंबई परिसरात काहीसे ढगाळ वातावरण राहील. ९, १० आणि ११ जानेवारी यादरम्यान तापमानात आणखी घसरण होऊन थंडीत वाढच होणार आहे.

१० जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहील. तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. खान्देश व लगतच्या नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात ९ जानेवारी रोजी पावसाची शक्यता अधिक असेल. ९ जानेवारी रोजी शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्याच्या तुरळक भागात किरकोळ गारपिटीची शक्यता आहे.

ढगाळ व पावसाळी वातावरण ओसरल्यानंतर म्हणजे ११ जानेवारीपासून उत्तर भारतातून उत्तर व ईशान्य दिशेकडून थंड कोरडे वारे वाहतील. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडीची शक्यता जाणवते. ११ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान १६ व दुपारचे कमाल तापमान २८ असेल.- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

  • मुंबई    १७.५
  • नाशिक    १३.५
  • जळगाव    १६.८
  • छ. संभाजीनगर    १६.९
  • महाबळेश्वर    १४.१
  • मालेगाव    १७
  • परभणी    १७.१
  • धाराशिव    १७.४
  • अहमदनगर    १७.५
  • सातारा    १७.५
  • सोलापूर    १७.७
टॅग्स :मुंबई