Join us

रेल्वेच्या प्रवाशांची उद्या लागणार ‘कसोटी’; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 09:16 IST

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वेकडून रविवारी ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक हाती घेण्यात येणार आहे. 

पश्चिम रेल्वे-

पश्चिम रेल्वेनेही बोरीवली ते राममंदिर स्थानकांदरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉक काळात रेल्वे रूळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहेत. त्यामुळे उपनगरी लोकलच्या काही फेऱ्या रद्द केल्या जाणार असून, एक्स्प्रेस गाड्याही १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने धावणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वे-

ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर कामांसाठी रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात अप मेल / एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जातील. तर, डाउन मेल / एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. अप आणि डाउन जलद मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.

मेमू क्रमांक ०१३३९ वसई रोड-दिवा गाडी सकाळी ९.५० वाजता वसई रोडवरून कोपरपर्यंत धावेल. तर, कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान ही सेवा रद्द राहील.

पनवेल-वाशी मार्ग बंद-

१) हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ यावेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर आणि ठाणे ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी-वाशी, ठाणे ते वाशी / नेरूळ, बेलापूर-नेरूळ आणि उरणदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.

२) पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द असेल.

३) पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२०पर्यंत पनवेल येथे  जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेपश्चिम रेल्वेहार्बर रेल्वे