Join us
Daily Top 2Weekly Top 5

राणीच्या बागेत सिंहाची डरकाळी? गुजरातकडे आशियाई सिंहाच्या दोन जोड्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:42 IST

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) लवकरच वाघासोबत सिंहही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) लवकरच वाघासोबत सिंहही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या उद्यानात आशियाई सिंहांचे पर्यटकांना दर्शन व्हावे, यासाठी गुजरात सरकारकडे सिंहाच्या दोन जोड्यांची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र पाठविले असून, त्यात उद्यानाच्या आधुनिकिकरणानंतर आशियाई सिंहासाठी तयार केलेल्या विशेष अधिवासाचा उल्लेख केला आहे.

राणीच्या बागेचे आधुनिकिकरण केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या (सीझेडए) मंजूर आराखड्यानुसार करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात हम्बोल्ट पेंग्विन प्रदर्शन, अंतर्गत बाग, तिकीट काउंटर, प्राणी रुग्णालय, स्वयंपाकघर, क्वारंटाईन क्षेत्र तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आसनव्यवस्था आणि इतर नागरी सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात विविध प्राण्यांसाठी स्वतंत्र अधिवास तयार केले असून, त्यात आशियाई सिंह, वाघ, स्लॉथ बेअर, हायना, बिबट्या, चितळ, माकडे आणि विविध पक्षांसाठी वेगवेगळे विभाग उभारले आहेत.

सक्करबाग प्राणिसंग्रहालयाकडे यापूर्वीच प्रस्तावप्राण्यांची देवाण-घेवाण करण्यासाठी यापूर्वी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय प्रशासनाने देशातील विविध प्राणिसंग्रहालयांना प्रस्ताव पाठविला होता.

गुजरात मधील सक्करबाग प्राणिसंग्रहालय (जुनागढ) येथे आशियाई सिंह सर्वाधिक असल्याने त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांना दोन मादी हम्बोल्ट पेंग्विन, दोन झेब्रा, दोन कॉकटेल व्हाईट, दोन कॉकटेल ग्रे आणि एक हॉर्नबिल देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्या बदल्यात आशियाई सिंह उपलब्ध होऊ शकले नाहीत.

आश्रयस्थाने, उंच व्यासपीठे, गुहा, घनदाट झाडांसह पाणी व्यवस्थाआशियाई सिंहासाठी खास अधिवास तयार केला असून तो गुजरातमधील मालधारी समुदायाच्या वस्तीच्या धर्तीवर विकसित करण्यात आला आहे. या परिसरात सिंहांच्या विश्रांतीसाठी आश्रयस्थाने, उंच व्यासपीठे, गुहा, पाण्याची व्यवस्था तसेच घनदाट झाडांची लागवड केली आहे. पर्यटकांना सुरक्षितरीत्या सिंहाचे दर्शन घेता यावे, यासाठी काचेची गॅलरीही उभारली आहे.

पाच वर्षांपासून पाठपुरावामुंबई पालिकेकडून गेल्या पाच वर्षांपासून गुजरात सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तरीही सिंह उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे सद्भावनेच्या भूमिकेतून गुजरात सरकारने दोन जोड्या सिंह उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती केली आहे. त्यामुळे आशियाई सिंह येथे दाखल झाल्यास भायखळा प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण वाढेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Zoo Seeks Lions from Gujarat for Enhanced Attraction

Web Summary : Mumbai's Byculla Zoo requests Gujarat for Asiatic lion pairs. Modernized habitat ready, awaiting approval. Previous exchange attempts failed. New enclosure mimics natural environment.
टॅग्स :मुंबईराणी बगीचा