Join us  

...तर हत्तीचे नाव चंपा, माकडाचे नाव चिवा ठेवू; महापौरांचा भाजपला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 7:28 AM

चंद्रकांत पाटील यांना हत्तीची तर चित्रा वाघ यांना माकडाची उपमा

मुंबई : राणीबागेत मंगळवारी पार पडलेल्या नामकरण सोहळ्यात छोट्या पेंग्विनचे नाव ऑस्कर ठेवण्यात आल्याने विरोधकांच्या भुवया उंचविल्या. भाजपच्या नेत्यांनी या इंग्रजी नावावर टीका केल्याने महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आहेत. त्यामुळे या टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांना हत्तीची तर चित्रा वाघ यांना माकडाची उपमा दिली. पुढच्या वेळी हत्तीच्या पिलाला चंपा, तर माकडाच्या पिलाचे नाव चिवा ठेवू, असा टोला त्यांनी गुरुवारी लगावला.  पेंग्विनच्या बाळाचे इंग्रजी नाव ठेवल्याने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका केली. याचा समाचार घेत मराठी नावे ठेवायला हवी, तर पुढच्या वेळी चंपा आणि चिवा नाव ठेवू. हत्तीच्या पिलाला चंपा आणि एक माकडाचे पिलू जन्मणार आहे, त्याचे नाव चिवा ठेवू, असे महापौर म्हणाल्या.  अमराठी नगरसेवक असलेल्या भाजपचे उपदेश नकोमुंबई : भायखळा येथील प्रसिद्ध राणी बागेत जन्मलेल्या पेंग्विनचे नाव ऑस्कर असे ठेवल्याने भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. याचे प्रत्युत्तर देत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. nमुंबई महापालिकेत भाजपचे ८२ पैकी ४८ नगरसेवक अमराठी, गुजराती भाषिक आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला मराठी भाषा, नावांबाबत उपदेश देऊ नयेत, अशी टीका त्यांनी केली आहे. त्यामुळे नामकरणावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली आहे. पेंग्विनचे इंग्रजी नामकरण देखील थट्टेचा विषय ठरला आहे. मात्र जगात सर्वात मोठा पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्काराचे नाव आहे. हा पुरस्कार ज्यांना दिला जातो ते त्यासाठी स्वतःला धन्य समजतात, असे अध्यक्ष जाधव यांनी निदर्शनास आणले.मुंबईकरांमुळे कोविड नियंत्रणातमुंबईत कोरोना रुग्णसंख्या चारपटीने कमी होत आहे. आरोग्य यंत्रणेवर स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. कोरोनाबाबत विरोधकांचाही सल्ला घेतला जात आहे. आज मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचे श्रेय मुंबईकरांचेच आहे. कोविड नियंत्रणात आणण्यात मुंबईकरांचा सिंहाचा वाटा आहे, असे मत महापौरांनी व्यक्त केले आहे.  शाखा पातळीवर लसीकरणज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे आहे, त्यांनी संमतीपत्र द्यावे. सध्या १५ ते १७ वर्षे वयोगटातीला मुलांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. त्यामुळे पालकांनी विश्वासाने आपल्या मुलांना लस देण्याकरिता संमती द्यावी. बाळासाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाखा पातळीवर १५ ते १७ वयोगटांतील मुलांचे लसीकरण करण्याचे कार्यक्रम घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :किशोरी पेडणेकरभाजपाचंद्रकांत पाटीलचित्रा वाघ