Join us  

मंत्रालयासमोर धुळ्यातील सरकारी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 1:05 PM

मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

मुंबई - मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. धुळ्यातील रहिवासी असलेले बबन यशवंत झोटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (11 जून) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत बबन झोटे यांना ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. बबन झोटे हे धुळे नगर पालिकेतील कर्मचारी होते, अशी माहिती समोर आली आहे.  

धुळे नगरपालिका असताना 1989 मध्ये झालेल्या नोकर भरती प्रक्रियेची सीआयडी चौकशी करावी, या मागणीसाठी झोटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. झोटे यांनी मनपा सेवेतून कमी करण्यात आले होते. 

दरम्यान, मंत्रालयात वारंवार होणा-या आत्महत्या आणि आत्महत्यांचे प्रयत्न रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात नायलॉनची संरक्षक जाळी बसवण्यात आली. त्यावेळेस, विरोधकांनी मंत्रालयात जाळी बसवण्याच्या कामावर सडकून टीका केली होती. 'लोकांनी उड्या घेऊ नये म्हणून मंत्रालयात संरक्षक जाळी लावण्यात आली. पण फक्त जाळी लावून उपयोग नाही. जनतेला न्याय द्यायचा असेल तर सरकारने आधी आपल्या कारभारावर लागलेली जाळी-जळमटी काढली पाहिजेत. ती जाळी काढणार नसाल तर या जाळीचा काडीचाही उपयोग नाही', असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हाणला होता.

मंत्रालय परिसरातील आत्महत्येच्या घटना8 फेब्रुवारी 2018 ला मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून त्रिमुर्ती प्रांगणात उडी मारत हर्षल रावते या 43 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. स्वत:च्या मेहुणीच्या हत्येच्या आरोपाखाली जन्पठेपेत असणा-या हर्षलला शिक्षेत सुट हवी होती. याच मागणीसाठी तो मंत्रालयात आला होता. 

त्यापूर्वी 22 जानेवारी 2018 ला धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतक-याने मंत्रालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा पुढे उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

तसेच, अहमदनगरचा रहिवासी अविनाश शेटे (२५) यांनेही मंत्रालयात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अविनाशने कृषी अधिकारीपदासाठी परीक्षा दिली होती. यात अपयशी ठरलेल्या अविनाशने फेरतपासणीची मागणी केली होती. त्यासाठी तो वारंवार मंत्रालयात खेटे घालत होता.

टॅग्स :मंत्रालयमुंबईआत्महत्या