Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 21:21 IST

रविवार, दि. १६ डिसेंबर, २०१८ रोजी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.  

मुंबईम्हाडाच्यामुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील १३८४  सदनिकांच्या संगणकिय सोडतीकरीता विक्रमी  १ लाख ६४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. रविवार, दि. १६ डिसेंबर, २०१८ रोजी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.         माननीय गृहनिर्माण मंत्री श्री. प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली  होणा-या  प्रशस्त कार्यक्रमात म्हाडाचे अध्यक्ष माननीय श्री. उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीकरिता  मुंबई उपनगरचे माननीय पालकमंत्री तथा राज्याचे शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे, मुंबई शहराचे माननीय पालकमंत्री तथा राज्याचे उदयोग मंत्री श्री. सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून माननीय गृहनिर्माण राज्यमंत्री श्री. रविंद्र वायकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे माननीय सभापती  श्री. मधु चव्हाण,  मुंबई इमारत दुरूस्त्ती व पुनर्रचना मंडळाचे माननीय सभापती  श्री. विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपटटी सुधार मंडळाचे माननीय सभापती श्री . विजय नाहटा, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे माननीय सभापती श्री. बाळासाहेब पाटील, माननीय खासदार श्रीमती पूनम महाजन, माननीय आमदार श्रीमती तृप्ती सावंत, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद म्हैसकर उपस्थित राहणार आहेत.                         म्हाडाच्या संकेतस्थळावरून वेबकास्टींगद्वारे या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे."वेबकास्टींग" तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहण्याकरीता http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर लॉग इन करावे. सोडत कार्यक्रम सुरू होण्यापुर्वी करण्यात येणा-या तयारीचे देखील थेट प्रक्षेपण सकाळी साडेसात वाजेपासुन संकेतस्थळावर वेबकास्टींद्वारे  करण्यात येणार आहे. शिवाय म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला असून येथे व्यासपीठावर होणाऱ्या संगणकीय सोडतीचे सुस्पष्ट प्रक्षेपण पाहता येईल. त्याकरीता म्हाडा भवनाच्या प्रांगणातील मंडपात पाच मोठ्या आकाराचे एलईडी स्क्रीन्स देखील लावण्यात आले आहेत. म्हाडाच्या सदनिका विक्री सोडतीमध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांची उत्सुकता लक्षात घेता  म्हाडा प्रांगणात  सुरक्षेकरिता अग्निशमन दलाचे बंब/वाहिका, रुग्णवाहिका, सुरक्षारक्षक तसेच येणाऱ्या अर्जदारांकरिता चहा- पाण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांनी सोडत कार्यक्रमात सहभाग घेण्याकरिता स्व:ताच्या अर्जाची पोचपावती आणने बंधनकारक राहील.            यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटाकरिता सायन प्रतीक्षा  नगर, मानखुर्द, चांदिवली, पवई,मागाठाणे, बोरिवली येथे सदनिका उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटाकरिता अँटॉप हिल वडाळा, प्रतीक्षा नगर सायन, पीएमजीपी मानखुर्द, गव्हाणपाडा मुलुंड, सिद्धार्थ नगर गोरेगाव, चांदिवली पवई, कन्नमवार नगर विक्रोळी येथे सदनिका उपलब्ध आहेत. तर मध्यम उत्पन्न गटाकरीता महावीर नगर कांदिवली, आम्रपाली टागोर नगर, घाटकोपर,वडाळा , माटुंगा, दादर, शैलेंद्र नगर दहिसर, मागाठाणे बोरिवली, मालवणी मालाड, सिद्धार्थ नगर,उन्नत नगर गोरेगाव व चारकोप येथे सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटाकरीतापंत नगर घाटकोपर, सहकार नगर चेंबूर, ग्रांट रोड , वडाळा, सायन , माटुंगा , बोरिवली,कांदिवली, तुंगा पवई, लोअर परेल, चारकोप  येथील सदनिका उपलब्ध आहेत.      सोडतीमधील विजेत्या तसेच प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in  या संकेतस्थळावर दि. १६ डिसेंबर, २०१८ रोजी सांयकाळी ६ वाजता प्रसिध्द केली जाणार आहे .त्याचप्रमाणे सदरील माहिती संकेतस्थळावर अपलोड केल्याबाबतचा संदेश सर्व अर्जदारांना भ्रमणध्वनीवरुन पाठविला जाणार आहे.

टॅग्स :म्हाडामुंबई