बॉलीवूडमधून मुंबई हरवतेय

By Admin | Updated: January 25, 2015 01:08 IST2015-01-25T01:08:34+5:302015-01-25T01:08:34+5:30

सध्या चित्रपटसृष्टीही वेगळ्या संक्रमणातून जात आहे. विशेषत: मुंबईत चित्रीकरण करणे खूपच कठीण झाले आहे.

Mumbai is losing from Bollywood | बॉलीवूडमधून मुंबई हरवतेय

बॉलीवूडमधून मुंबई हरवतेय

महेश भट्ट यांची खंत : लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट
अनुज अलंकार - मुंबई
सध्या चित्रपटसृष्टीही वेगळ्या संक्रमणातून जात आहे. विशेषत: मुंबईत चित्रीकरण करणे खूपच कठीण झाले आहे. त्यासाठी काही विशिष्ट परवानग्या घेण्यासाठी अनेक विभागांमधील अधिकाऱ्यांना लाच देण्याशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे निर्माते वैतागतात. परिणामी चित्रीकरणासाठी मुंबईबाहेर जाणे योग्य ठरते. अशा प्रकारे बॉलीवूडमधून मुंबई हरवत चालली आहे, असे खंत प्रसिद्ध सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी व्यक्त केली.
‘खामोशिया’ चित्रपटाच्या गुरमीत चौधरी, अली फजल आणि सपना पब्बी या टीमसोबत महेश भट्ट यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुंबईत चित्रीकरण करताना येणाऱ्या अडचणी, सेन्सॉर बोर्डाची परिस्थिती आणि ‘पीके’ चित्रपटाबाबतीतही आपली मते मांडली. मुंबईतील ट्रॅफिक वगैरै बाबी ध्यानी घेता इथे चित्रीकरण करणे अवघडच आहे.
मुंबईची म्हणून दाखवण्यात येणारी दृश्ये साऊथ आफ्रिका किंवा इतर देशांत जाऊन चित्रित करावी लागतात. तिथल्या सरकारकडून त्यासाठी संपूर्ण सहकार्य मिळते, असे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांपुढे या समस्या मांडल्या आहेत. ही परिस्थिती चिंताजनक असून त्यावर मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन सर्वच मुख्यमंत्र्यांनी दिले. तथापि, परिस्थिती फारशी बदलली नाही, उलट समस्या वाढतच आहेत. याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

‘पीके’चा निर्णय योग्य : ‘पीके’ चित्रपटाबाबत महाराष्ट्रातल्या सरकारने जी भूमिका घेतली ती खरोखरच चांगली आहे. दिल्लीच्या दबावापुढे न झुकता राज्य सरकारने ‘पीके’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे चालू ठेवण्यास सांगितले. यामुळे सरकार कौतुकास पात्र असल्याचे भट्ट यांनी सांगितले.

सेन्सॉरच्या नियमावलीतच समस्या
गेल्या आठवड्यात ‘मेसेंजर आॅफ गॉड’ चित्रपटाला परवानगी दिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे स्थितीत काही बदल होणार नाही. कारण त्याच्या नियमावलीतच खरी गोम असून, जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत असेच वाद होणार, असे स्पष्ट मत महेश भट्ट यांनी व्यक्त केले.

Web Title: Mumbai is losing from Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.