Join us
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेवर आज-उद्या १६३ लोकल होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 06:58 IST

कांदिवली यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवारी दुपारी २ ते रविवारी मध्यरात्री १ दरम्यान पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असून या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावर सुमारे १६२ लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

कांदिवली यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार असून सकाळी १०:४८ ते दुपारी ३:४५ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या लोकल गाड्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

ब्लॉकचे परिणाम 

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारच्या ब्लॉक कालावधीत ७३ लोकल रद्द होणार असून रविवारी ८९ लोकल रद्द होणार आहेत. सोबतच ४ एक्स्प्रेस शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील. मध्य रेल्वेवर ब्लॉक कालावधीत मस्जिद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, या स्थानकांवर लोकल उपलब्ध होणार नाहीत.

हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक 

हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११:४० ते सायंकाळी ४:४० पर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते वडाळा रोड आणि वाशी ते बेलापूर-पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे-गोरेगाव या मार्गावरील सेवा सकाळी ११:१६ ते सायंकाळी ४:४७पर्यंत बंद राहतील. या काळात पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा धावतील. 

टॅग्स :मुंबईमुंबई ट्रेन अपडेटपश्चिम रेल्वे