Join us

मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!

By सचिन लुंगसे | Updated: May 31, 2024 18:54 IST

मध्य रेल्वेच्या वतीने ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी हाती घेतलेला ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० पर्यंत आहे.

मुंबई : ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी गुरुवारी रात्री १२.३० वाजता सुरु झालेल्या ब्लॉकने मुंबईकरांचा घाम काढला असतानाच आता शनिवारी मध्य रेल्वे मार्गावर ५३४ लोकल फे-या रद्द करत रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या तुलनेत उद्या म्हणजेच शनिवारी मुंबईकरांचा लोकल प्रवास यातनादायक होणार असून, मुंबईकरांचे लोकलहाल कायम राहणार आहेत.

मध्य रेल्वेच्या वतीने ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी हाती घेतलेला ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० पर्यंत आहे. तर सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी शुक्रवारी रात्री १२.३० वाजता सुरु होणारा ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० पर्यंत चालणार आहे. या ब्लॉकसाठी शनिवारी ५३४ तर रविवारी २३५ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवारी ३७ तर रविवारी ३१ मेल/एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी येथील ब्लॉकमुळे लोकल हार्बर मार्गावर वडाळ्यापर्यंत तर मुख्य लाईनवर भायखळयापर्यंत चालविण्यात येणार आहे. तिन्ही दिवसांच्या ब्लॉकमुळे एकूण ९३० लोकल फे-या रद्द करण्यात आल्या असून, शनिवारी सर्वाधिक म्हणजे ५३४ लोकल फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईकरांनी महत्त्वाच्या कामाशिवाय लोकलने प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेच्या प्रवाशांना करण्यात आले आहे. शिवाय बहुतांशी कार्यालयांनी आपल्या कर्मचा-यांना वर्क फ्रॉर्म होम करण्याची परवानगी द्यावी, असे विनंतीही रेल्वेच्या वतीने कार्यालयांना करण्यात आली आहे. 

टॅग्स :लोकलरेल्वेमुंबई