Mumbai Local Train Mega Block: मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी दरम्यानची सेवा मेगाब्लॉकमध्ये बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल प्रवास करताना वेळापत्रक पाहून नियोजन करावं लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान सकाळी १३:३० ते दुपारी ३:३० या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटीवरून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तसेच सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ दरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या नियमित थांब्यावर थांबतील आणि माटुंगा स्थानकावरून जलद मार्गावर वळवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ या कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही गाड्या वांद्रे आणि दादर स्थानकात शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
हार्बरवर विशेष लोकल सेवा
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटीवरून १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल दिशेने जाणाऱ्या सेवा रद्द राहतील. तसेच असे असले तरी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - कुर्ला आणि पनवेल - वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर लाईनच्या प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांवरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
दरम्यान, मेगाब्लॉक दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेदरम्यान ठाणे-वाशी/नेरूळ मार्गे प्रवास करण्याची मुभा असणार आहे. हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.