लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि विद्याविहार दरम्यान १०:५५ ते ३:५५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक राहील. हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी-चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० आणि अप हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते संध्याकाळी ४:१० पर्यंत ब्लॉक राहणार आहे.सीएसएमटी येथून सकाळी १०:४८ वाजल्यापासून ३:४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या ट्रेन, सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर विद्याविहार स्थानकापासून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर स्थानक येथून सकाळी १०:१९ वाजल्यापासून ३:५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्यांही अशाच पद्धतीने अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
सीएसएमटी येथून सकाळी ११:१६ ते सायंकाळी ४:४७ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील ट्रेन, त्याचप्रमाणे सकाळी १०:४८ ते संध्याकाळी ४:४३ पर्यंत वांद्रे / गोरेगावला जाणाऱ्या सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवासी ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करू शकतात.
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली आणि गोरेगाव दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान अप डाऊन स्लो लाईनवर जम्बो ब्लॉक आहे. या काळात गोरेगाव व बोरीवली दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविल्या जातील. अंधेरी, बोरीवलीच्या काही लोकल गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावर चालविल्या जातील. बोरीवली येथील १, २, ३ आणि ४ प्लॅटफॉर्मवरून एकही लोकल सुटणार नाही.