कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली असून गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. "मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच तात्काळ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टीमने दुरुस्तीचे काम सुरु केले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुलुंड आणि दादर स्थानकांदरम्यान अप फास्ट गाड्या अप स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत", अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, सोमवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे आसनगाव, कर्जत आणि अंबरनाथकडे जाणाऱ्या गाड्या रात्री उशिराने धावत होत्या. अनेक स्थानकांवर गर्दी झाली. अनेक प्रवाशांनी बराच वेळ लोकलची वाट पाहावी लागत असल्याची तक्रार केली. तसेच वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांबद्दल निराशा व्यक्त केली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इतर लोकल गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर वळवण्यात आल्या. दरम्यान, ४० मिनिटांत ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यात आली आणि रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अप स्लो लाईनवरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या, अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.