मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी १०:५० ते दुपारी ३:२० या कालावधीत ठाणे आणि दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन जलद मार्गावरील गाड्या ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असून, त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकांत थांबविण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे सीएसएमटीवरून अप आणि डाउन मार्गांवरील सुमारे १८ मेल / एक्स्प्रेस गाड्यांना लेटमार्क लागणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन पाचव्या मार्गावरील मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावरून वळवण्यात येतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस /दादर/ शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या अप सहाव्या मार्गावरील मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून वळवण्यात येतील.
अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० या ब्लॉक कालावधीत वाशी / नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ठाणे येथून सकाळी १०:३५ ते सायंकाळी ४:०७ वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०:२५ ते दुपारी ४:०९ वाजेपर्यंत जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.