मुंबई : हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळक नगर स्थानकांदरम्यान नवीन मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे १४:३० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड-मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहील. शनिवारी रात्री ११:०५ ते रविवारी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. हार्बर मार्गावरील वडाळा रोड - मानखुर्द दरम्यान अप, डाऊन मार्गावर ब्लॉक आहे.
या कालावधीत वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान सेवा ठप्प होईल. शनिवारी रात्री १०:२० ते रविवारी दुपारी २:१९ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. तर, शनिवारी रात्री १०:०७ वाजेपासून रविवारी दुपारी १२:५६ वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणारी सेवा रद्द असेल.
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल रात्री ९:५२ वाजताची पनवेल - सीएसएमटी असेल.
डाऊन हार्बर मार्गावरील वाशी/बेलापूर/पनवेलसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून शनिवारी रात्री १०:१४ वाजता सुटेल.
ब्लॉकनंतरची पहिली लोकल रविवारी दुपारी १:०९ वाजता पनवेलहून सीएसएमटी दिशेने जाईल.
डाऊन हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटीहून रविवारी दुपारी १:३० वाजता सुटेल.
ब्लॉकदरम्यान पनवेल-मानखुर्द-पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.
ठाणे ते कल्याण मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेणार
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( सीएसएमटी ) लोकमान्य टिळक टर्मिनस ( एलटीटी) या स्थानकावर येणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या सुमारे १८ एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याणदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील.
परिणामी, त्या १० ते १५ मिनिटांच्या उशिराने धावतील. तसेच सकाळी ९:५० ची वसई रोड-दिवा मेमू गाडी कोपर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.