Join us

Mumbai Local: लोकलचा पास व क्यूआर कोडसाठी रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 21:09 IST

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास १५  ऑगस्ट पासून परवानगी मिळणार असल्याच्या अनुषंगाने भाईंदर व मीरा रोड रेल्वे स्थानकात लोकांनी एकच गर्दी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड - कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास १५  ऑगस्ट पासून परवानगी मिळणार असल्याच्या अनुषंगाने भाईंदर व मीरा रोड रेल्वे स्थानकात लोकांनी एकच गर्दी केली. भाईंदर पूर्वेला तर पालिकेचे कर्मचारीच नसल्याने लोकांना दीड तास ताटकळत रहावे लागले.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरी भविष्यात तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. दरम्यान लसीचे २, डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्ट पासून लोकलचे दार खुले  केले आहे.  लसीचे दोन डोस घेतलेल्यांना क्यू आर कोड मार्फत पास काढता येणार आहे. 

त्या अनुषंगाने आज बुधवारी सकाळी सहा वाजल्या पासून लोकांनी क्यूआर कोड मिळवण्या साठी रांगा लावल्या होत्या. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी टेबले मांडून येणाऱ्या लोकांची एनटिजेन चाचणी चालवली होती. नंतर त्यांच्या लसीचे दोन डोस दिल्याची खात्री करून ओळखपत्र तपासून क्यूआर कोड दिला जात होता. क्यूआर कोड मिळाल्यावर पास काढण्यासाठी सुद्धा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

भाईंदर पूर्वेला तर पालिकेचे टेबलच सुमारे दिड तास उशिराने लागले. ७ ची वेळ असल्याने लोकांनी गर्दी केली होती. परंतु पालिकेचे कर्मचारीच आले नसल्याने दिड तासांनी क्यूआर कोड देण्यास सुरुवात झाली. परंतु तो पर्यंत लोकांचे हाल झाले. पालिकेच्या भोंगळ कारभारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :मुंबई लोकलकोरोना वायरस बातम्या