मुंबईतील भांडूप परिसरात काल (२२ जुलै २०२५) संध्याकाळी घर कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संभाव्य धोका लक्षात घेऊन घरे तातडीने रिकामी करण्यात आली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपच्या खिंडीपाडा भागात ओमेगा हायस्कूलच्या मागे असलेल्या घराची भिंत कोसळली. संरक्षक भिंतीला भेगा पडल्याने घर कोसळल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ रहिवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत दिसत आहे की, सुमारे पन्नास फूट उंच असलेल्या या टेकडीभोवती एक बांधण्यात आली होती, जी सततच्या पावसामुळे कोसळली.
मुंबईसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊसमुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने आज (बुधवार, २२ जुलै २०२५) मुंबईसह, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. सततच्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी आणि वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.